केंद्रात बाजारस्नेही मोदी सरकार आल्यानंतरच्या पहिल्या धुमधडाक्यात यशस्वी ठरलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्सच्या खुल्या भागविक्रीनंतर (आयपीओ), शुक्रवारी या कंपनीच्या समभागांच्या शेअर बाजारात सूचिबद्धतेने गेली काही वर्षे मरगळलेल्या प्राथमिक भांडवली बाजाराला ऊर्जा बहाल केली. भागविक्रीत स्नोमॅनच्या समभाग मिळालेल्या गुंतवणूकदारांना, पदार्पणाच्या पहिल्या सौद्याने त्यांचा गुंतलेला पैशाला तब्बल ७० टक्के अधिमूल्य मिळवून दिले.
अर्थव्यवस्थेत अपेक्षित सुधाराचा लाभार्थी ठरणाऱ्या उद्योग क्षेत्रांमध्ये दळणवळण क्षेत्राला महत्त्वाचे स्थान निश्चित आहे. विशेषत: कृषी माल, दुग्ध उत्पादने, फळे-मांस, मासे वगैरे नाशिवंत वस्तूंच्या देशांतर्गत तापमान नियंत्रित वाहनांद्वारे मालवाहतुकीत असलेल्या स्नोमॅन लॉजिस्टिक्सची स्पर्धक ठरेल अशी अन्य दुसरी सूचिबद्ध कंपनी नसणे हा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने विशेष गुण ठरला आहे. स्नोमॅनच्या भागविक्रीत तब्बल ६० पटीहून अधिक बोली लावणारे अर्ज आले, त्यातही व्यक्तिगत (रिटेल) गुंतवणूकदारांकडून ४१ पटीने भरणा झाला होता. त्यामुळे विक्री पश्चात प्रत्येकी ४७ रुपये दराने झालेले समभागांचे वितरण हे सर्वच बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना इच्छित प्रमाणात झाले असण्याची शक्यता कमीच आहे. तरी ज्यांनी हे समभाग मिळविले त्यांना शुक्रवारी पहिल्याच दिवशी समभागाचा भाव ७० टक्के फायद्यासह ७८ रुपयांवर पोहोचल्याचे पाहण्याचे सुख या भागविक्रीने दिले. एनएसईवर या समभागाने ७९.८० रुपये (६९.७९%) तर बीएसईवर ७८.७५ रुपये (६७.५५%) उच्चांक शुक्रवारी दाखविला.