१,००० कंपन्यांचे थकीत कर्ज एक लाख कोटींनी कमी

बँकांकडून कर्जपुरवठय़ाचे प्रमाण मार्च २०१७ अखेरच्या वित्त वर्षांत कमालीचे खालावले असून ते ५.१ टक्के या किमान स्तरावर रोडावले आहे. आघाडीच्या १,००० कंपन्यांचे थकीत कर्ज यंदा एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता बँकांच्या कर्ज पुरवठय़ावर स्टेट बँकेने तयार केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. यानुसार यंदा बँकेच्या कर्जपुरवठय़ात कमालीची घसरण झाली आहे. यापूर्वी १९५१ मध्ये १.८ टक्के पतपुरवठा वाढ नोंदली गेली होती.

पतपुरवठय़ातील यंदाची घसरण प्रामुख्याने आघाडीच्या १० कंपन्यांमुळे नोंदली गेली आहे. भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या या कंपन्यांनी प्रामुख्याने ३३,५७१ कोटी रुपये यंदा कमी कर्ज घेतले आहे.

स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी म्हटले आहे की, थकित कर्जाबाबत कंपन्यांबरोबरच बँकांचीही स्थिती सुधारत आहे. मालमत्ता विकून तसेच मान्यताप्राप्त गुंतवणूकदार संस्थांच्या माध्यमातून, खासगी गुंतवणूकदारांद्वारे कंपन्या आपली वित्तीय स्थिती सुधारत असून परिणामी त्यांचे कर्जप्रमाणही कमी होत आहे. तसेच कायद्याच्या उपाययोजनांमुळे बँकांनाही वाढत्या बुडित कर्जाचा तिढा सोडविणे आता सुलभ होऊ लागले आहे, असेही ते म्हणाले.

कर्जस्थिती सुधारण्यामध्ये गेल इंडिया (-४८ टक्के), पिरामल एंटरप्राईजेस (-३७ टक्के), नॅशनल फर्टिलायझर्स (-३७ टक्के), लार्सन अँड टुब्रो (-२४ टक्के), जेट एअरवेज (-२२ टक्के), हिंदाल्को (-२० टक्के) यांचा याबाबतच्या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

बुडित कर्जाची रक्कम ८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. पैकी ६ लाख कोटी रुपये सार्वजनिक बँकांचे आहे. वाढत्या बुडित कर्जाचा सामना करण्यासाठी तसेच त्याच्या वसुलीसाठीचे कायदे कडक करण्यात आले आहेत.