भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान (इंन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त पगार मिळत असल्याची माहिती ‘मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स रिपोर्ट’मध्ये नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सरासरी पगार ३४६.४२ रुपये प्रती तास इतका आहे. तर निर्माण (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील कर्माचाऱ्यांना सर्वात कमी वेतन मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. निर्माण क्षेत्रातील कर्माचाऱ्यांचा सरासरी पगार २५४.०४ रुपये इतका आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाद्वारे सरकार निर्माण क्षेत्रावर भर देत असून देखील हे क्षेत्र सर्वात कमी पगार देणारे क्षेत्र आहे. भारतातील आयटी क्षेत्र सर्वात उत्तम पगार देणारे क्षेत्र असले तरी या क्षेत्रातील केवळ ५७.४ टक्के कर्माचारी आपल्या वेतनावर संतुष्ट असल्याचे मॉन्स्टरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बँक, वित्त आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील कर्माचाऱ्यांचा सरासरी पगार ३००.२३ रुपये प्रती तास इतका आहे. आयटी आणि बीएफएसआय ही भारतातील सर्वात अधिक पगार देणारी क्षेत्र असून देखील या दोन्ही क्षेत्रातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्माचारी आपल्या पगाराबाबत खूप कमी संतुष्ट असल्याचे पाहून मॉन्स्टर डॉट कॉम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी आश्चर्य व्यक्त केले.