इंजिन्सचे वितरक आणि जनरेटर संचांशी संलग्न सुटे भाग व तंत्रज्ञानाची विकासक व उत्पादक कंपनी जॅकसन पॉवर सोल्यूशन्सने भारतातील आपल्या पहिल्या जागतिक प्रशिक्षण केंद्र आणि सेवा सुविधेचे अनावरण अलीकडेच केले. कमिन्स इंडियाच्या सहयोगाने सुरू झालेल्या या केंद्रातून प्रामुख्याने कमिन्सकडून निर्मित ३००० केव्हीए इलेक्ट्रॉनिक इंजिन्सबाबत समग्र स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सुमारे ८६,००० चौरस फूटाच्या क्षेत्रफळावर उभ्या राहिलेल्या प्रशिक्षण केंद्रातून दरसाल १२०० अभियंते आणि तंत्रज्ज्ञांना प्रशिक्षित करण्याची क्षमता आहे. कमिन्सबरोबर जवळपास ३० वर्षे सुरू असलेल्या भागीदारीचे हे पुढचे पाऊल असल्याचे जॅकसन पॉवर सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक समीर गुप्ता यांनी सांगितले. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक ती उत्पादने अद्ययावत करण्याबाबत तसेच प्रशिक्षण सुविधा उंचावत नेण्यासाठी जॅकसन आणि कमिन्स या उभयतांनी सुसज्जता केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टीजेएसबीचे २०१४ मध्ये शाखांचे शतक
मंगळवारी ४२ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या दि ठाणे जनता सहकारी बँकेने ७७ शाखांचा टप्पाही पार केला आहे. टीजेएसबी म्हणून ओळखली जाणाऱ्या ठाणे सहकारी बँकेने मार्च २०१४ अखेपर्यंत शाखांचे शतक साजरे करण्याचा संकल्प सोडला आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत बँक महाराष्ट्रातील दोन शाखांसह गुजरात (तीन) आणि कर्नाटक (एक) येथेही शाखा विस्तार करणार आहे. यानुसार या कालावधीपर्यंत बँकेच्या एकूण ८२ शाखा होणार असून १७ शाखा २०१३-१४ या आर्थिक वर्षांत सुरू केल्या जातील. ८,५०० कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या या बँकेची मोबाईल बँकिंग सेवाही लवकरच सुरू होत आहे. २६ हून अधिक बँका व पतपेढय़ांना माहिती तंत्रज्ञान सुविधाही पुरविणारी टीजेएसबी ही आधार कार्ड संलग्न सेवा देणारी एकमेव सहकारी बँक ठरली आहे.
*आर कॉम’ची लिनोव्होसह भागीदारी
दूरसंचार सेवा पुरवठादार रिलायन्स कम्युनिकेशन्सने नाविन्यपूर्ण स्मार्ट फोन्सची श्रेणी लवकरच प्रस्तुत करण्याबरोबरच, देशातील सीडीएमए फोन उपकरणांचे परितंत्र आमूलाग्र बदलण्यासाठी तंत्रज्ञान अग्रणी लिनोव्हो या कंपनीबरोबर भागीदारी जाहीर केली आहे. विविध स्क्रीन आणि वेगवेगळ्या क्षमता व वेगाचे प्रोसेसर असलेली ही स्मार्ट फोन्स आकर्षक किमतीला आणि एकाचवेळी जीएसएम आणि सीडीएमए अशा दोन्ही सेवांवर काम करणारे असतील. रिलायन्स देशभरातील २५०० दालनांमधून तसेच लिनोव्होच्या १००० कंपनी दालनांमधून ती उपलब्ध होतील, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
विक्री दुपटीने वाढवून १५०० कोटींवर नेण्याचे एशियन ग्रॅनिटोचे लक्ष्य
देशातील आघाडीच्या पाच फरशी निर्मात्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आक्रमकपणे विस्ताराच्या आपल्या नियोजनात येत्या तीन-चार वर्षांत विक्री उलाढाल दुपटीने वाढवून १५०० कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. यात निर्यातही सध्याच्या तुलनेत पाच पटीने वाढवून १०० कोटी रुपयांपर्यंत वाढविली जाणार आहे. एशियन ग्रॅनिटोने कात टाकताना, ‘एजीएल टाइल्स वर्ल्ड’ अशी नवीन ब्रॅण्ड प्रतिमा धारण केली आहे. कंपनीच्या या नव्या आधुनिक प्रतिमेचे अनावरण एशियन ग्रॅनिटो इंडिया लि.चे अध्यक्ष कमलेश पटेल यांनी अलीकडेच केले. त्या समयी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आगामी विस्तार नियोजनाची माहिती दिली. भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सिरॅमिक टाइल्सची निर्मिती करणाऱ्या या कंपनीचा एकूण महसुलात देशांतर्गत रिटेल विक्रीचे योगदान ६० टक्क्यांच्या आसपास आहे. कंपनीने अलीकडेच मोठय़ा आकाराच्या डिजिटल व्ह्रिटीफाइड टाइल्सही बाजारात दाखल केल्या आहेत.