अनिल अंबानी यांच्या ज्येष्ठ पुत्राचा उद्योजकीय आरंभ

अनिल अंबानी यांचे ज्येष्ठ पुत्र यांची रिलायन्स कॅपिटल या कंपनीच्या संचालक पदी वर्णी लागल्याने, रिलायन्स – अनिल धीरुभाई अंबानी समूहात (एडीएजी) या उद्योगघराण्याच्या दुसऱ्या  पिढीची रुजुवात झाली आहे.

सध्या या समूहात स्वत: अनिल व त्यांची पत्नी टीना या कार्यरत आहेत. तर आता रिलायन्स कॅपिटलच्या संचालक मंडळावर त्यांचे २४ वर्षीय पुत्र जय अनमोल यांना अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जय अनमोल हे कंपनीची भागीदार जपानी निप्पॉनबरोबरच्या वाटाघाटीतही सहभागी होते. रिलायन्स म्युच्युअल फंडमध्ये त्यांनी दोन महिने प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केले आहे. ब्रिटनमध्ये व्यावसायिक शिक्षण घेतलेले जय अनमोल हे २०१४ पासून रिलायन्सच्या विविध वित्त कंपन्यांमध्ये सक्रिय आहेत. नव्या नियुक्तीनंतर, गेल्या दोन वर्षांत आपल्याला खूप शिकायला मिळाले; त्याचा विनियोग आता नव्या जबाबदारीद्वारे होईल, असे जय अनमोल यांनी म्हटले आहे. रिलायन्स कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम घोष यांनीही या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

अंबानी कुटुंबीयांची तिसरी पिढी आता उद्योग क्षेत्रात सक्रिय होत आहे. मुकेश अंबानी यांची ज्येष्ठ कन्या इशा अंबानी यांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम तसेच रिलायन्स रिटेल व्हेंचरच्या संचालक मंडळावर दोन वर्षांपूर्वीच घेण्यात आले. इशा यांचा जुळा भाऊ आकाशही तिच्याबरोबर या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहे.