पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर असताना जपानी कंपनीने भारताती बँकेच्या स्थापनेत रस दाखविला आहे. निप्पॉनने अनिल अंबानी यांच्या रिलायन्सबरोबर या व्यवसायात उतरण्याचा मनोदय पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्यक्त केला. जपानी वित्त क्षेत्रातील आघाडीच्या निप्पॉनची सध्या रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीबरोबर २६ टक्के भागीदारीचे सहकार्य आहे. रिलायन्ससोबतच नव्या पिढीतील बँक व्यवसायासाठीही निप्पॉन उत्सुक आहे, असे निप्पॉन लाइफचे अध्यक्ष त्सुत्सुई यांनी सांगितले. रिलायन्स कॅपिटलसह तिने दोन नव्या म्युच्युअल फंडांची घोषणाही केली. भारताच्या इक्विटी व बॉण्ड बाजारात जपानी गुंतवणूकदारांचा या फंडांद्वारे सहभाग होईल.