जपानच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या २६५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या (साधारण १८ लाख कोटी रुपये) कार्यक्रमाची जपानी पंतप्रधान शिंझो आबे यांनी केलेल्या घोषणेने बुधवारी जागतिक भांडवली बाजाराला उत्साही वळण दिले. आर्थिक उत्तेजनाचा ही नवीन डोस मिळाल्याने जपानी अर्थव्यवस्थेचा अडखळलेला वृद्धीपथ सुकर होणे अपेक्षित आहे.
त्याच वेळी अमेरिकी अर्थव्यवस्थाही दमदार बनत असल्याचे दर्शविणारी ताजी आकडेवारी गुंतवणूकदारांना सुखावणारी असली, तरी त्याचा परिणाम म्हणून तेथील मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याज दरात वाढीसंबंधी कोणता पवित्रा घेतला जाईल, याबद्दलची साशंकता वाढली आहे. व्याजाचे दर वाढविले गेल्यास भारतासह अन्य उभरत्या बाजारांसाठी हा मोठा आघात ठरेल.
देशाच्या मध्यवर्ती बँकेचे पतधोरण जाहीर करण्यास दिवसाचा अवधी असतानाच जपानच्या पंतप्रधानांनी ही घोषणा केली. जाहीर केलेल्या अर्थसाहाय्यामध्ये १३ लाख कोटी येनच्या विविध योजना/उपक्रमावरील सरकारी खर्चाचाही समावेश आहे.