अस्तित्वापासून आर्थिक तोटय़ात असलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीची प्रक्रिया अखेर अबुधाबीस्थित इतिहादमुळे बुधवारी पूर्णत्वास आली. जेटमधील २४ टक्के हिस्सा इतिहाद २,०६० कोटी रुपयांना खरेदी करत असल्याचे राजधानी उभयतांमार्फत जाहीर करण्यात आले.
आखाती हवाई प्रवासी वाहतूक कंपनीचे आर्थिक बळ मिळताच कंपनी येत्या तीन वर्षांत नफ्यात येईल, असा आशावाद जेट एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांनी लगेच व्यक्त केला. विदेशी गुंतवणुकीसाठी भारतीय हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतरचा हा दुसरा मोठा व्यवहार आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून गजाआड असलेल्या सुब्रतो रॉय यांच्या सहारा इंडिया हवाई कंपनीला आपल्या पंखाखाली घेणाऱ्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इतिहाद गेल्या काही महिन्यांपासून उत्सुक होती. याबाबतची चर्चा सुरू असतानाच मलेशियन हवाई कंपनी एअर एशिया मागून पुढे गेली. कंपनीबरोबर टाटा समूहाने भागीदारी करत स्वस्तातील हवाई सेवेचे रणशिंगही फुंकले. टाटा सन्सच्या भागीदारीतील दुसरा हवाई प्रवास टाटा-सिंगापूर एअरलाइन्सच्या माध्यमातून सुरू होत असतानाच बुधवारी जेट-इतिहादची प्रक्रिया पार पडली.
सार्वजनिक एअर इंडियासह देशातील सर्व हवाई कंपन्या सध्या आर्थिक तोटय़ात आहेत. जेट एअरवेजनेही गेल्या आर्थिक वर्षांत ४,१३० कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. व्यवसायाने ‘टेक ऑफ’ घेताच किंगफिशरमध्ये सामावलेली एअर डेक्कनची प्रमुख प्रवर्तकही गेल्या वर्षभरापासून जमिनीवरच आहे. तर नव्या दमाच्या गो एअर, इंडिगो, स्पाइसजेट यांची सध्या ‘काँटे की टक्कर’ आहे. हवाई प्राधिकरणाने आणखी चार कंपन्यांना हवाई उड्डाणाचे परवाने दिले आहेच. या पाश्र्वभूमीवर इतिहादच्या रूपाने जेटसह एकूणच हवाई क्षेत्रात चैतन्य पसरले आहे. एअर एशियानंतरही ही दुसरी मोठी थेट विदेशी गुंतवणूक या क्षेत्रात आली आहे.
नव्या भागीदारीमुळे एअर इंडियाशी थेट स्पर्धा निर्माण होणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्टार अलायन्सला (एअर इंडियाची व्यावसायिक भागीदार) टक्कर दिली जाणार आहे. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया, एअर सेरेबियासारख्या कंपन्यांमध्ये भागीदारी करणाऱ्या इतिहादच्या ताफ्यात ७०० हून अधिक विमाने आहेत. अ‍ॅटलान्टामधील प्रस्तावित भागीदारीनंतर इतिहाद ही जगातील पाचवी मोठी कंपनी होणार आहे.

जेट-इतिहाद भागीदारीच्या बुधवारच्या नवी दिल्लीतील घोषणेप्रसंगी इतिहाद एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष जेम्स होगान, जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी क्रॅमर बेल.