मे महिन्यात एकाच वेळी ग्रीष्माचे आणि महागाईचे चटके दिल्यानंतर जून महिन्यात महागाईच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मात्र असे असले तरीही गतवर्षीच्या जून महिन्यातील किमतींच्या तुलनेत यंदा महागाईचा निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी चढाच असल्याचे निदर्शनास आले आहे. बटाटे आणि कांदे यांच्या किमती वगळता अन्य कृषी उत्पादनांच्या किमतीतील घसरण हे महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.
मे २०१४ मध्ये महागाईच्या घाऊक किंमत निर्देशांकाने ६.०१ टक्क्यांचा आकडा पार केला होता. तर जून महिन्यात हा निर्देशांक ५.४३ टक्क्यांवर राहिला. जून महिन्यात अन्नधान्य व भाजीपाल्याच्या किमतींत ५.८९ टक्क्यांनी घट झाली.
मात्र बटाटय़ांच्या घाऊक किमती निर्देशांकात झालेली ४२.५१ टक्क्यांची वाढ तर कांद्याच्या घाऊक किमती निर्देशांकात झालेली १०.७० टक्क्यांची वाढ यामुळे जून महिन्यातील घसरणीचा निर्देशांक ५.४३ टक्क्यांपर्यंतच सीमित राहिला.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याच दृष्टीने गेल्या महिन्यात कांद्याच्या निर्यातीसाठी किमान मूल्य एका टनासाठी ३०० डॉलर तर बटाटय़ांचे किमान निर्यात मूल्य ४५० डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आले होते. 


यातच मान्सूनने तब्बल एक महिना उशिराने आगमन केल्यामुळे संभाव्य भाववाढ टाळण्यासाठी केंद्रातर्फे ५० लाख टन तांदूळ खुल्या बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यात आला. तसेच साठवणुकीवरही मर्यादा घालण्यात आली. या कालावधीत तृणधान्याच्या किमती ५.३३ टक्क्यांनी घसरल्या, मात्र डाळींच्या किमतीत गतवर्षी जून महिन्यातील किमतींच्या तुलनेत १.७८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
अन्नपदार्थाव्यतिरिक्त अन्य पदार्थाच्या गटात महागाईचा निर्देशांक ३.४९ टक्के इतका राहिला. कापसाच्या किमतींमध्ये ८.३१ टक्क्यांनी वाढ झाली मात्र मानवनिर्मित वस्त्रांचे मूल्य ५.५४ टक्क्यांनी चढे राहिले. सिमेंट आणि चुनखडी यांच्या दरात ४.४५ टक्क्यांनी घसरण झाली तर धातूंच्या किमती २.८३ टक्क्यांनी वाढल्या.