डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने कल्पेन पारेख यांची सह-अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. या आधी पारेख हे आयडीएफसी म्युच्युअल फंडात व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाच्या विक्री, परिचालन, मनुष्यबळ, व जोखीम व्यवस्थापन या विभागांची जबाबदारी त्यांच्यावर असेल. ऑक्टोबर-डिसेंबर २०१७ या कालावधीत डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाची मालमत्ता सर्वाधिक वेगाने वाढली असून म्युच्युअल फंडाच्या क्रमवारीत डीएसपी ब्लॅकरॉक नवव्या क्रमांकावर आहे. एकंदर गंगाजळीबाबत मागील तिमाहीअखेरीस आघाडी घेत आयडीएफसी म्युच्युअल फंडाला मागे सारत दहाव्या क्रमांकावरून नवव्या स्थानी या फंड घराण्याने प्रगती साधली.

 

प्रभात डेअरीच्या ग्राहक व्यवसाय प्रमुखपदी मुथर बाशा

मुंबई : हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ब्रिटानिया यासारख्या जागतिक ख्यातीच्या कंपन्यांमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ विक्री आणि विपणनाचा अनुभव असलेले मुथर बाशा प्रभात डेअरी लिमिटेडच्या ग्राहक व्यवसाय प्रमुखपदी नुकतेच रुजू झाले. कंपनीच्या महत्त्वाच्या संघाचा ते भाग असतील आणि संपूर्ण जीटीएम (गो टू मार्केट)ची धुरा सांभाळतील. हा पदभार सांभाळण्यापूर्वी बाशा हे अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्स आणि जपानच्या मित्सुईचा पाठिंबा असलेल्या ग्लोबल कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेड या कंपनीत महाव्यवस्थापक व विक्री विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

बाशा यांनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळला होता. तसेच त्यांच्याकडे नेपाळ व बांगलादेशच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या होत्या. बाशा यांनी हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये सेल्स, कस्टमर डेव्हलपमेंट, मार्केटिंग विभागात जवळपास २२ वर्षे काम पाहिले.