संशोधन-विकासाला चालना, नवीन वस्त्रोद्योग उद्याने, ब्रॅण्डिंग, विपणन, कौशल्य विकास वगैरे केंद्रे सरकारने हाती घेतलेल्या प्रोत्साहनपर उपायांतून वस्त्रोद्योग क्षेत्राने मोठी झेप घेण्याला दमदार पृष्ठभूमी निर्माण केली आहे. जोडीला उत्पादन नावीन्यता आणि नवतंत्रज्ञानाचा अवलंब केला गेल्यास वस्त्रोद्योगातून पुढील तीन वर्षांत एक कोटी रोजगारनिर्मितीचे लक्ष्य गाठले जाऊ शकेल, असा विश्वास वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी व्यक्त केला.

भारतातील वस्त्रोद्योग यंत्रसामग्री निर्मात्यांनी जागतिक पातळीशी बरोबरी साधणारी उंची गाठायला हवी, असे नमूद करीत डॉ. गुप्ता यांनी भारतीय निर्मात्यांनाच देशांतर्गत उद्योगाच्या नेमक्या गरजा ध्यानात येऊ शकतील, अशी पुस्ती जोडली. येथे सुरू असलेल्या इंडिया इट्मी (आयटीएमई) २०१६ या वस्त्रोद्योग तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सास्मिरामधील वस्त्र-अभियंत्यापुढे डॉ. गुप्ता बोलत होत्या.

इंडिया इट्मी २०१६ मध्ये जगातील सर्वोत्तम नाविन्यता व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मांडले गेले आहे. ३८ देशांमधील १०५० वस्त्रोद्य्ोग यंत्रसामग्रीचे निर्माते त्यांची उत्पादने घेऊन येथे आली आहेत. जगातील सर्व नामांकित नावे भारताकडे एक सुसंधी म्हणून पाहत आहेत. आपणही या उपयुक्त संधींचा लाभ घेण्यास सुरुवात करण्यास हीच सुयोग्य वेळ आहे. देशांतर्गत उद्योगाचा पाया आधुनिक तंत्रज्ञानाने कणखर बनविला गेल्यास अधिकाधिक रोजगाराची वाट मोकळी होईल, असे त्या म्हणाल्या.

देशाच्या निर्यातीत ११ टक्के असे सर्वाधिक योगदान वस्त्रोद्योगातून मिळते. २०१५-१६ मध्ये एकंदर वस्त्रोद्योग निर्यात ४० अब्ज डॉलरची होती, ती २०२१ पर्यंत २२३ अब्ज डॉलरवर जाणे या उद्योगक्षेत्राला अपेक्षित आहे.