विविध १७ हून अधिक बँकांचे ७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज थकीत करणाऱ्या विजय मल्ल्या यांना ‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणजेच निर्ढावलेले कर्जबुडवे जाहीर करण्याची तयारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केली आहे.
याबाबतची नोटीस मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला पाठविण्यात आली असून येत्या आठवडाभरात त्याचे उत्तर न दिल्यास मल्ल्या यांना ही ‘पदवी’ दिली जाण्याची शक्यता आहे.
देशातील विविध १७ हून अधिक बँकांनी मुख्य प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला ७ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे. याबाबत पुढाकार घेत पंजाब नॅशनल बँकेने २१ ऑगस्टला नोटीस पाठविली आहे. बँकेचे ७७० कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने थकविले आहे. या नोटिशीला आव्हान देण्याचा प्रयत्न कंपनीनेही सुरू केला असून मंगळवारीच मल्ल्या यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
बँकेने पाठविलेल्या नोटिशीला येत्या आठवडाभरात उत्तर न दिल्यास गेल्या वर्षभरापासून जमिनीवर असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख प्रवर्तक विजय मल्ल्या त्यांची हवाई वाहतूक कंपनी तसेच कर्जासाठीची हमीदार कंपनी युनायटेड ब्रुअरिज (होल्डिंग्स) लिमिटेड यांना निर्ढावलेले कर्जबुडवे म्हणून जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेच्या नोटिशीला आव्हान देण्याची बाब कंपनीचे ज्येष्ठ विधिज्ञ राजीव नय्यर यांनी न्या. बदर र्दुेज अहमद व सिद्धार्थ मृदुल यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी मांडली. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी पुन्हा होणार आहे. बँकेमार्फत कंपनीवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या खटल्यात केंद्रीय अर्थ मंत्रालय व बँक यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.