गेल्या दोन वर्षांपासून जमिनीवर असलेल्या विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सद्वारे अन्य कंपन्यांमध्ये पैसे वळते केल्याच्या प्रकरणाची आता गंभीर गुन्हे तपास कार्यालय चौकशी करणार आहे. याबाबत तपास यंत्रणेने यूनायटेड स्पिरिट्सला सविस्तर माहितीसाठी विचारले आहे.
मल्ल्या यांच्या मालकीच्या यूनायटेड स्पिरिट्सवर सध्या ब्रिटनच्या दिआजिओचा ताबा आहे. किंगफिशरने विविध बँकांकडून घेतलेले कर्जरुपी पैसे फायद्यातील यूनायटेड स्पिरिट्समध्ये वळते केल्याचा संशय आहे. याबाबत विचारणा झाल्याचे यूनायटेड स्पिरिट्सने मुंंबई शेअर बाजाराला कळविले आहे. कंपनी तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. २०१२ पासून उड्डाणे ठप्प पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सने १६,०२३ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने २०१० ते २०१३ दरम्यान यूनायटेड स्पिरिट्ससह मल्ल्या यांच्या यूबी समूहातील अन्य कंपन्यांमध्येही गुंतवणूक केल्याचे मानले जाते.