आयएनजी वैश्य बँक विलिन करून घेतल्यानंतर कोटक महिंद्र बँकेने नवे समभाग सोमवारी भांडवली बाजारात सूचिबद्ध करून घेतले. याबाबतची प्रक्रिया राष्ट्रीय शेअर बाजारात समारंभपूर्वक पार पडली. नव्या समभागांचे व्यवहारही सोमवारपासूनच अस्तित्वात आले.
आयएनजी वैश्य बँकेच्या भागधारकांनी प्रत्येकी ५ रुपये मूल्याचे १३,९२,०५,१५९ समभाग जारी केले होते. विलिनीकरणाच्या वेळी आयएनजी वैश्यच्या भागधारकांना कोटक महिंद्रचे प्रत्येकी १,००० समभागांमागे ७२५ समभाग जारी करण्याचे घोषित करण्यात आले होते. सोमवारी कोटक महिंद्र बँकेचा समभाग मात्र २.२ टक्क्य़ांनी घसरून १,३३८.०५ रुपयांवर स्थिरावला.
आयएनजी वैश्यचे कोटक महिंद्र बँकेतील विलिनीकरण नव्या चालू आर्थिक वर्षांपासूनच, १ एप्रिल २०१५ पासून अस्तित्वात आले आहे. एकत्रित बँकेचा आकार आता २ लाख कोटी रुपयांचा झाला आहे.