भारताच्या विशालतम वाहनपूरक उद्योगांच्या जंत्रीत टायर व्यवसायाचे महत्त्वपूर्ण स्थान असून, येत्या काळात या व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले होऊ घातले आहे. संपूर्ण जगातील बडय़ा उत्पादकांचा या व्यवसाय क्षेत्रात प्रवेश होऊ घातला असून, टायर उद्योगातही युरोपीय राष्ट्रसंघाच्या धर्तीवर ‘गो ग्रीन’चा घोषा सुरू झाल्यास नवल ठरणार नाही, असाच सूर मुंबईत साजरा झालेल्या ‘लॅन्सेक्स रबर डे’ सोहळ्यातील चर्चा-संवादातून पुढे येताना दिसला.
‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’कडून आयोजित होत असलेल्या सातव्या ‘रबर एक्स्पो’ या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या ‘लॅन्सेक्स रबरदिना’चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव एम. ए. फारुकी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. डिसेंबर २०१० मध्ये आयोजित पहिल्या रबरदिनानंतर योजलेले हे दुसरे पर्व सोमवारी, हॉटेल रेनेसॉ, पवई येथे पार पडले. जगभरात रबर उद्योगाच्या ४ टक्के वृद्धीदराच्या तुलनेत भारतात हा उद्योग जवळपास दुप्पट म्हणजे ७ टक्के दराने प्रगती साधत आहे, तर आगामी पंचवार्षिक नियोजनाप्रमाणे या उद्योगाने लवकरच आठ टक्क्यांचा वृद्धीदर गाठलेला दिसेल, असे प्रतिपादन फारुकी यांनी याप्रसंगी बोलताना केले.
भारत सध्याच्या घडीला जगातील पाचवी मोठी वाहन उद्योगाची बाजारपेठ असली तरी वाहन प्रदूषणविषयक नियंत्रण व नियमनाचा तुलनेने मोठा अभाव दिसून येतो. वाहन उद्योगातील इंजिन, इंधन या बरोबरीनेच क्योटो करार आणि त्या पाठोपाठ आलेल्या दोहा वातावरणविषयक वाटाघाटींचा अंमल हा टायर या अन्य घटकासाठी लागू व्हावा, असा विषय या रबरदिनाचे आयोजक असलेल्या लॅन्सेक्स एजी या जर्मन कंपनीने पटलावर आणला आहे. ‘युरो २’ अशा वाहनासाठी वापरात इंजिनाच्या लेबलिंगच्या धर्तीवर टायर्ससाठी सक्तीचे लेबलिंग आवश्यक ठरले असल्याची कृत्रिम रबराची जागतिक निर्माता कंपनी लॅन्सेक्सची धारणा आहे.
युरोपीय राष्ट्रसंघात अलीकडेच नोव्हेंबरपासून हे सक्तीचे लेबलिंग सुरू झाले आहे. कृत्रिम रबरापासून बनलेल्या ‘अ’ श्रेणीच्या टायर्सचा प्रवासी वाहनांमध्ये वापर केल्यास, इंधनात किमान सात टक्के बचत साध्य करता येते, असा लॅन्सेक्सचा दावा आहे. इंधनाची बचत म्हणजे पर्यायाने प्रदूषकांच्या मात्रेतही घट आणि पर्यावरणसुलभताही साधली जाते, असा या संबंधाने लॅन्सेक्सचा युक्तिवाद आहे.
आपल्या या धारणेचा आम भारतीय ग्राहकांमध्ये प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘लॅन्सेक्स’ने आयपॅड तसेच आयफोनवर डाऊनलोड करता येण्याजोगे ‘अ‍ॅप’ही विकसित केले आहे.