देशातील सर्वात स्वस्त प्रवासी कार म्हणून सादर करण्यात आलेल्या टाटा मोटर्सच्या नॅनोचे नवे रूप मंगळवारी मुंबईत समोर आले. जेनएक्स नॅनो नावांतर्गत या कारची किंमत २.१९ लाख रुपयांपुढे आहे. एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सएमए, एक्सटीए या पाच प्रकारांत ती उपलब्ध आहे.
कंपनीच्या देशभरातील ४५० दालनांमधून मंगळवारपासूनच ही कार उपलब्ध झाल्याची माहिती या वेळी ‘नॅनो’चे संकल्पनाकार, टाटा मोटर्सच्या कार्यक्रम नियोजन व प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी दिली. कंपनीच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष मयांक पारिख हेही या वेळी उपस्थित होते. कंपनीने वर्षभरापूर्वी राबविलेल्या होरायझोनेक्स्ट संकल्पनेतील झेस्ट आणि बोल्टनंतरची ही तिसरी कार असून. छोटय़ा कारच्या वर्गवारीतील तगडी स्पर्धक आहे. नॅनो सर्वप्रथम मार्च २००९ मध्ये भारतीय वाहन क्षेत्रात उतरविण्यात आली होती. सुरुवातीच्या एक लाख रुपये किमतीच्या या कारची विक्री गेल्या आर्थिक वर्षांत २० टक्क्यांनी घसरून १६,९०१ वर आली आहे.