४जी तंत्रज्ञानावरील आणखी एक चिनी मोबाइल कंपनी भारतात दाखल झाली आहे. लिनोवोने एलटीई हा ४जी तंत्रज्ञानावर आधारित नवा स्मार्टफोन ७ हजार रुपयांना उपलब्ध करून दिला आहे.

४जी तंत्रज्ञानाचा चिनी कंपनीचाच शिओमी हा स्मार्टफोन शुक्रवारपासूनच भारतात उपलब्ध होत आहे. त्याची किंमत १० हजार रुपये आहे. तर गेल्याच आठवडय़ात सादर झालेल्या ४जी यूजच्या युरेका या स्मार्टफोनची किंमतही जवळपास ९ हजार रुपयेच आहे.
लिनोवो ए६००० नावाचा हा फोन सर्वप्रथम लास वेगास येथे गेल्या आठवडय़ात सादर करण्यात आला होता. नवा फोन चीनच्याच शिओमीला टक्कर देण्यासाठी आल्याचे मानले जात आहे. या तंत्रज्ञानातील सध्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर करून लिनोवोने आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. एलटीईमध्ये उच्च वेग क्षमतेची डाटा सुविधा देण्यात आली आहे. कंपनी हा स्मार्टफोन फ्लिकपार्ट या ई-कॉमर्स व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या विचारात असल्याचे लिनोवो इंडियाच्या स्मार्टफोन विभागाचे संचालक सुधिन माथुर यांनी म्हटले आहे. यासाठी तूर्त नोंदणी करणे आवश्यक असून प्रत्यक्षात २८ जानेवारीपासून तो बाजारपेठेत उपलब्ध होईल.
४जी तसेच ३जी तंत्रज्ञानावरील स्मार्टफोनची संख्या २०१८ पर्यंत २० कोटी होण्याचा अंदाज आहे. देशातील काही शहरांमध्ये भारती एअरटेल, एअरसेल अशा निवडक कंपन्यांची ४जीवर आधारित दूरसंचार सेवा आहे. मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स जिओ इन्फोकॉमची ही सेवा चालू वर्षांत सुरू होणे अपेक्षित आहे. ४जीसाठी देशव्यापी परवाना मिळविलेल्या एकमेव रिलायन्सची ४जी सेवा गेल्या वर्षांपासून प्रतीक्षेत आहे.