जपानी भागीदार ‘नोमुरा’ बाहेर

जपानी भागीदार नोमुरा बाहेर पडताच एलआयसीच्या म्युच्युअल फंड कंपनीने नवा अवतार धारण केला आहे. कंपनीने एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड हे नाव आता एलआयसी म्युच्युअल फंड असे करण्यात आले असून कंपनीचे बोधचिन्हही नव्याने सादर करण्यात आले आहे.
देशातील ४२ फंड घराण्यांमध्ये १४,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनासह कंपनी सध्या १८ व्या स्थानावर आहे. कंपनीत पाच वर्षांपूर्वी नोमुराने ३५ टक्के हिस्सा प्राप्त केला होता. तो रिता होताच आता मुख्य एलआयसीचा कंपनीत सर्वाधिक ४५ टक्के, एलआयसी हाऊसिंग फायनान्सचा ३९.३ टक्के, जीआयसी हाऊसिंग फायनान्सचा ११.७ व कॉर्पोरेशन बँकेचा ४ टक्के हिस्सा असेल.
कंपनी लवकरच पहिल्या तीन फंड कंपन्यांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास एलआयसीचे अध्यक्ष एस. के. रॉय यांनी व्यक्त केला आहे. तर येत्या तीन वर्षांत कंपनीचे निधी व्यवस्थापन एक लाख कोटींवर जाईल, असे फंड कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सरोज दिखले यांनी म्हटले आहे.
कंपनीने जानेवारी ते मार्च २०१६ या तिमाहीत मालमत्तेतील ४१.२६ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीच्या सध्या विविध २५हून अधिक फंड योजना आहेत.
नोमुरा ही भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारी गेल्या काही वर्षांतील सहावी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ठरली आहे. यापूर्वी मॉर्गन स्टेनले, आयएनजी, प्रिमेरिका, इन्व्हेस्को आदी विदेशी कंपन्यांनी त्यांचा येथील भागीदारी व्यवसाय विकला आहे.