चालू आर्थिक वर्षांत सुमारे २०,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता व्यवस्थापनाचे लक्ष्य एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड कंपनीने राखले आहे. कंपनीची सध्याची सरासरी मालमत्ता ११,००० कोटी रुपये आहे. ती २०१४-१५ मध्ये दुप्पट होईल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश साठे यांनी वृत्तसंस्थेजवळ व्यक्त केला. गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत इक्विटी फंडांमधील गुंतवणूक वाढली असल्याचे नमूद करीत साठे यांनी कंपनीने सध्या मिड-कॅप फंड सुरू करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज सादर केल्याचे सांगितले. विद्यमान वित्तीय वर्षांत कंपनी काही डेट फंड योजनाही सादर करेल, असेही त्यांनी नमूद केले. याचबरोबर कंपनी पुढील कालावधीत ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसी व जपानी कंपनी नोमुरा यांची भागीदारी असलेल्या एलआयसी नोमुराचा मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात पहिल्या दहा कंपन्यांमध्ये क्रम लागतो.