विमा कंपनीची दावे निवारणाची (क्लेम सेटलमेंट) क्षमता ग्राहकांच्या आयुर्विमा योजनेची निवड करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे विमा कंपनीची दावा पूर्ततेची प्रक्रिया त्यांच्या कामगिरीच्या मोजमापातील एक महत्त्वाचा घटक ठरते.
दावा हाताळणी प्रक्रियेभोवती पुरेसे नियामक प्रशासन असून विमा कंपन्यांना त्यासाठी योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे ‘आयआरडीए’ने घालून दिली आहेत. विमा कंपन्या सेवाविषयक कार्यक्षमता दाखविण्यासाठी योग्य ती पावले उचलतात आणि दावा प्रक्रिया सोपी तसेच वेगवान करतात. विमा खरेदीच्या प्रारंभिक प्रस्तावाच्या टप्प्यात ग्राहकांनी योग्य ती सर्व माहिती अस्सल स्वरूपात देणेही आवश्यक असून, त्यामुळे लाभार्थ्यांना दावा सादर करताना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही.
दाव्यांच्या सुलभ आणि वेगवान परताव्यांसाठी लाभार्थ्यांनी लक्षात घ्यावयाच्या गोष्टी-
प्रक्रिया समजून घेताना..
आयुर्विमा कंपनीला सूचना
दावा प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे विमाधारकाच्या मृत्यूबाबत विमा कंपनीला सूचना देणे. याला दावा सूचना असे म्हणतात. ही सूचना आपण विमा कंपनीच्या शाखा/कार्यालयाला भेट देऊन किंवी कंपनीला एक ई-मेल पाठवून देऊ शकतो. दावा सूचनेत मूलभूत माहिती असते जसे विमा पॉलिसी क्रमांक, विमाधारकाचे नाव, मृत्यूची तारीख, मृत्यूचे कारण, मृत्यूचे ठिकाण, वारसाचे नाव, वारसाचे विमाधारकाशी नाते इ. त्यामुळे दावा प्रक्रिया सुरू होते.
दावा दाखलाची कालमर्यादा
दावा सादर करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही. परंतु नंतरच्या अडचणी आणि कारण नसताना उशीर टाळण्यासाठी लवकरात लवकर दावा करणे उत्तम ठरेल. दावा प्रक्रिया ही मुख्यत्वे विमा कंपनीने आखून दिलेल्या पद्धतीत आवश्यक ते दस्तऐवज सादर करण्याची गोष्ट असते. दस्तऐवज नीट असल्यास दाव्याची पूर्तता कोणताही उशीर न करता होऊ शकते.
याशिवाय, दावा सादर करताना वारसाला विमा कंपनीने दिलेल्या दावा क्रमांकासह पाठपुरावा करू शकतो. लाभार्थी ऑनलाइन जाऊन संबंधित विमा कंपनीच्या वेबसाइटवर दावा अर्जाची ताजी स्थिती तपासू शकतात.
आवश्यक दस्तऐवज
महानगरपालिका/ग्रामपंचायतीचे मृत्यू प्रमाणपत्र वारसाने दाखल करायला हवे. या अत्यावश्यक गोष्टीसोबत दाव्याविषयक आणखी काही गरजा पूर्ण कराव्या लागतात. जसे विमा कंपनीकडून दिले गेलेले दावा अर्ज पूर्ण भरलेले असावे. वारसाने त्याचे छायाचित्र, पत्त्याचा पुरावा आणि ओळख पुरावा द्यावा लागतो. आपल्या माहितीबरोबरच विमा कंपन्यांना वारसाने अतिरिक्त पूरक दस्तऐवज जसे बँक खाते ताळेबंद द्यावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे दाव्याची रक्कम योग्य लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जाईल.
वर दिलेल्या गरजांशिवाय काही विमा कंपन्या विशिष्ट घटनांमध्ये अतिरिक्त दस्तऐवज मागवू शकतात. ते दाव्याचा प्रकार, कारण आणि मृत्यूची परिस्थिती यावर अवलंबून असते. सर्व गरजा सार्वत्रिक व अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू केलेल्या आहेत.
सर्व दस्तऐवज मूळ स्वरूपात किंवा छायांकित प्रत प्रकारात असल्यास त्यावर योग्य प्राधिकारी जसे एसईएम, मॅजिस्ट्रेट, गॅझेटेड अधिकारी किंवा स्थानिक मान्यता असलेला अधिकारी जसे पोलीस उपनिरीक्षक किंवा विमा कंपनीचे अधिकृत अधिकारी यांच्याकडून साक्षांकित केलेले असायला हवेत.
दावा प्रक्रियेचा कालावधी
आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमा कंपन्यांनी दाव्याचे सर्व दस्तऐवज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत दावा प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. तथापि, काही कंपन्या अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित यापेक्षा लवकर दावा पूर्ण करून, व्यवसायात आपले वेगळेपण सिद्ध करू शकतात.  काही कंपन्या तर दावा सात-आठ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे वचन देतात. तथापि, ही खात्री सर्व आवश्यक त्या दस्तऐवजांच्या सादरीकरणानंतर सुरू होते. दिलेल्या कालमर्यादेत दावा पूर्ण न झाल्यास ग्राहकांना कंपनीच्या धोरणानुसार विलंबित काळासाठी व्याज भरपाई दिली जाते.
तक्रार निवारणाची यंत्रणा
*विमाधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही एक यंत्रणा आहे. प्राथमिक पातळीवर विमाधारक आपल्या तक्रारी संबंधित विमा कंपन्यांकडे सादर करू शकतात. विमाधारक कंपनीच्या निर्णयाने समाधानी नसेल तर ‘आयआरडीए’च्या ‘इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट (आयजीएमएस)’ यंत्रणेकडे जाता येते. ज्यायोगे तक्रारीच्या कारणाचे विश्लेषण करून योग्य आणि प्रश्न सोडवले जातात. याशिवाय, वर दिलेल्या पर्यायांचाही उपयोग नाही झाला तर विमाधारक ग्राहक न्यायालयात आणि विमा लोकपालाकडेही जाऊ शकतो.
(लेखक आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत )