भारतातील विमा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही हे वास्तव आता नवीन राहिलेले नाही. तर भारतात विमा योजना घेण्याचे प्रमाण किती कमी आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. २०१५ मध्ये स्विस आरईने जाहीर केलेल्या अहवालानुसार, संरक्षणासाठी विम्यावर खर्च करणे आवश्यक असलेल्या प्रत्येक १०० रुपयांसाठी भारतीय सरासरी ७.८ रुपये खर्च करतात.

तुम्ही फक्त एकदाच जगता असे म्हटले जाते. ही संकल्पना मजेशीर आहे. ती लोकांना अतिशय साहसी व काही वेळा अविचारी गोष्टीही करायला सांगते.  वर्तमानामध्ये राहून जगायला काहीच हरकत नाही; पण आयुष्य एकदाच मिळणार असेल तर तुमच्या भविष्याच्या बाबतीत तुम्ही अधिक जबाबदार असायला हवे असे वाटत नाही का?

अमेरिकन लेखक व पत्रकार अँडी रूनी यांनी म्हटले होते, ‘तरुण मंडळींना मृत्यू म्हणजे खूप दूरची व त्यामुळेच एखाद्य अफवेसारखी घटना वाटते.’ मृत्यूसारख्या दुर्दैवी घटनेसाठी तयारी करण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे असे काही तरुणांना वाटते.

तर काहींचे प्राधान्य व गरज चांगले उत्पन्न ही असल्याने ते विम्यापेक्षा इतर आर्थिक उत्पादनांना पसंती देतात.

अलीकडेच, साधारण विशीतल्या एका तरुणाशी माझे बोलणे झाले. त्याच्या पैशांचा ‘उत्पादक’ वापर करण्यासाठी त्याने अन्य कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करण्याची तयारी दाखवली. पण आयुर्विमा योजना नको असल्याचे सांगितले.

त्याच्या मते, योजनेच्या प्रीमिअमसाठी भरावी लागणारी रक्कम तो अन्यत्र कुठेतरी वापरेल व एखादी विमा योजना देईल अशी सुरक्षितता देऊ शकणारा पुरेसा निधी उभारेल.

या विचारांच्या बाबतीत मला एक मुद्दा खटकतो. विम्याचा संबंध गुंतवणूक व उत्पन्न याच्याशी जोडू नये. हे संरक्षण देणारे साधन आहे आणि ते योग्य व अचूक स्वरूपात स्वीकारावे.

भारतातील विमा बाजारपेठ पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही हे वास्तव आता नवीन राहिलेले नाही. तर भारतात विमा योजना घेण्याचे प्रमाण किती कमी आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. २०१५ मध्ये स्विस आरईने जाहीर केलेल्या अहवालानुसार, संरक्षणासाठी विम्यावर खर्च करणे आवश्यक असलेल्या प्रत्येक १०० रुपयांसाठी भारतीय सरासरी ७.८ रुपये खर्च करतात व यामुळे ९२% हून अधिक इतकी प्रचंड तफावत निर्माण होते.

भारतासाठी ही चिंतेची बाब आहे हे स्पष्टच आहे. भारतीयांचा मूळत:च स्वभाव काळजी करण्याचा आहे आणि सतत ते आयुष्यात असे घडले तर या चिंतेत असतात. ‘माझ्या व्यवसायात मोठा तोटा झाला तर माझ्या कुटुंबाचे काय होईल?’ ‘कधीच बरा न होणारा आजार मला झाला तर माझ्या कुटुंबाचे काय होईल?’ अशा धोक्यांचा विचार करण्यासाठी आपण बराच वेळ घालवतो.

पण यातील कोणतीही परिस्थिती प्रत्यक्षात निर्माण झाली तर आपल्या प्रियजनांना संरक्षण मिळण्यासाठी आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात संरक्षण खरेदी करतात?

अगदी नैसर्गिक दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्ही रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात धोक्यांपासून बचाव करत असता. एखादी गृहिणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ व वस्तू विकत घेते आणि कुटुंबातल्या सदस्यांना रोज त्याच त्याच अन्नाचा कंटाळा येऊ नये म्हणून रोज वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बनवते.

तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सोप्या प्रकारची काळजी घेत असता. जसे की तुमचा जोडीदार आजारी असल्यास त्याला घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरकडे घेऊन जाणे, प्रवासादरम्यान तुमच्या अपत्याच्या सुरक्षेचा विचार करून चांगली कार घेण्यासाठी खर्च करणे किंवा तुमचे बाळ चालू लागल्यावर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने घरातल्या वस्तूंची काळजी घेणे, सीटबेल्ट लावण्याची किंवा हेल्मेट घालण्याची किंवा वाहतुकीचे नियम पाळण्याची आठवण तुमच्या जोडीदाराला करणे.

तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी दैनंदिन आयुष्यात इतक्या लहान गोष्टींची काळझी तुम्ही घेत असाल तर आयुर्विमा खरेदी करण्यासारख्या दीर्घकालीन सावधगिरीचा पर्याय घेण्यापूर्वी इतकी चलबिचल का करता? विमा न घेणे हे आयुष्याचा जुगार खेळण्यासारखे आहे. ‘मी भरलेल्या विमा हप्त्याचे फायदे मला मिळणार नाहीत’ हा दृष्टिकोन विमा योजना खरेदी करण्यापासून अनेकांना लांब ठेवतो. अनेकांना विमा योजना घेणे हे महागडे वाटते.

खरे तर तुमचे अकाली निधन झाल्यास तुमच्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी टर्म इन्शुरन्स योजना ही सर्वात स्वस्त पद्धत आहे. तुमचा आर्थिक पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण करत असताना व त्यामध्ये जोखमीच्या व स्थिर मालमत्तांचा समावेश करत असताना टर्म इन्शुरन्स योजना हे महत्त्वाचे उत्पादन समाविष्ट करण्यास विसरू नका.

तुमचा मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करेल इतका मोठा निधी तुम्ही उभारू शकता, असे तुम्हाला वाटत असेल कदाचित.  पण त्यासाठी टर्म इन्शुरन्स हा आदर्श पर्याय आहे. मला वाटते, तुम्ही गृहपाठ करावा. तुम्हाला नेमके कोणते उत्पादन आवश्यक आहे ते ओळखावे व तुम्हाला किती प्रमाणात जोखीम छत्र हवे आहे हे ठरवावे.

लेखक एगॉन लाइफ इन्शुरन्सचे मुख्य डिजिटल अधिकारी आहेत.