कर्मचाऱ्यांचे वेतन आणि बँकांचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या किंगफिशर एअरलाईन्सने उड्डाणे स्थगित असण्याच्या कालावधीत सुमारे ७५५.१७ कोटी रुपयांच्या तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. वर्षभरापूर्वी ४४४.२६ कोटी रुपयांचा लाभ मिळविणाऱ्या या कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या दरम्यान महसुलातील एकही रुपयाची भर घातलेली नाही.
दरम्यान, कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मात्र तिसऱ्या तिमाहीतील तोटा १,०९० कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. कंपनीने भांडवली बाजाराला कळविलेल्या ताळेबंदात ऑक्टोबर ते डिसेंबर कालावधीतल तोटय़ाची रक्कम ७५५.१७ कोटी रुपये नोंदविली असली तरी सध्या उड्डाणे स्थगित असलेल्या विमानांची किंमत, कर आणि कर्जे मिळून ही रक्कम एक हजार कोटींहून अधिक जाण्याची शक्यता बी. के. रामाध्यानी अ‍ॅन्ड कंपनी या लेखापरिक्षक कंपनीने व्यक्त केली आहे.
बँकांची कोटय़वधींची देणी थकबाकी असलेल्या आणि ताज्या तिमाहीत मोठा तोटा सहन करणाऱ्या किंगफिशर एअरलाईन्सच्या मुंबईतील मुख्यालयातील विद्युत पुरवठा मंगळवारी सकाळी खंडित करण्यात आला. अंधरी उपनगरातील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या कंपनीच्या या कार्यालयाने विजेच्या बिलापोटी रक्कम थकविल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. ऑक्टोबरपासून हवाई सेवा खंडित झालेल्या कंपनीच्या या कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांचा वावरही नाही. दरम्यान, थकित बिलाची रक्कम तसेच याबाबत कोणी कारवाई केली, हे मात्र समजू शकली नाही. उपनगरात प्रामुख्याने अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या रिलायन्समार्फत विद्युत पुरवठा मोठय़ा प्रमाणात केला जातो. तर कंपनी आदींसाठी टाटा पॉवरमार्फतही विजेची जोडणी पुरविली जाते.