अट्टल करबुडव्यांची नवीन सूची

१८ जणांनी १,१५० कोटींचा कर बुडविला

कर बुडव्यांची तिसरी यादी जाहीर करताना प्राप्तीकर विभागाने १८ जणांनी १,१५० कोटी रुपयांचा कर बुडविल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये मुंबईतील दिवंगत उदय आचार्य, अमुल व भावना आचार्य यांचीही नावे आहेत.

कर बुडव्यांमध्ये अनेक सोने तसेच हिरे व्यापारीही आहेत. तर आचार्य कुटुंबियांनी बुडविलेली कर रक्कम ७७९.०४ कोटी रुपये आहे. अहमदाबादस्थित जग हीत एक्स्पोर्टर्स, जसुभाई ज्वेलर्स, कल्याण ज्वेल्स, लिव्हरपूल रिटेल, धरेंद्र ओव्हरसीज, प्रफुल अखानी, नेक्क्सोफ्ट इन्फोटेल, ग्रेट मेटर्स प्रॉडक्ट्स, धीरेन अनंतराय मोदी आदींनीही कर बुडविला आहे. या कर दात्यांनी बुडविलेला कर कालावधी हा १९८९-९० ते २०१३-१४ दरम्यानचा आहे.

प्राप्तीकर विभागाने कर बुडवे जाहीर करताना ‘नाव व लाज’ (नेम अ‍ॅन्ड शेम) ही मोहिम राबविली होती. त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत नाव, रकमेसह संबंधितांचा पॅन, कर बुडविल्याचे वर्ष आदीही झळकविले आहेत.

यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये ४९ करबुडवे असून त्यांनी बुडविलेली कर रक्कम ही २,००० कोटी रुपयांची आहे.

करबुडवे कोण?

गुंतवणूकदारांना ठगणाऱ्या मुंबईस्थित कुख्यात उदय आचार्य व कुटुंबीयांसह, सुरतस्थित साक्षी एक्स्पोर्टस, दिल्लीतील बिमल गुप्ता, भोपाळमधील गरिमा मशिनरी, हेमंग शाह, मोहम्मद हाजी तसेच चंदीगडमधील व्हिनस रेमेडिज आदींचाही या यादीत समावेश आहे.