२५ हजारांच्या पुढे गेलेल्या सेन्सेक्सचा फायदा कसा घ्यायचा? पीएफच्या वाढीव व्याजदराचा कसा लाभ घेता येईल? वाढीव प्राप्तिकर मर्यादा व वजावटीत उत्पन्न कसे बसवायचे?..एखादी छोटीशी आर्थिक गुंतवणूक करायची म्हटली तरी अनेक प्रश्न डोक्यात घोळ घालत फिरतात. गुंतवणुकीतील धोक्यांची भीती आणि फायद्यांबाबतची साशंकता यामुळे सर्वसामान्य माणसांचा गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन संकुचित होत जातो. मात्र, हा घोळ दूर करणारा आणि चांगल्या गुंतवणुकीची वाट दाखवणारा मार्गदर्शक लवकरच वाचकांना लाभणार आहे. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबाबत साध्या व सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे ‘अर्थब्रह्म’ हे पुस्तक ‘लोकसत्ता’ने तयार केले असून येत्या २५ जुलै रोजी ते प्रकाशित केले जाणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प तसा आर्थिक वर्षांच्या जवळपास मध्यान्हीला उजाडला. प्राप्तिकराच्या लगीनघाईलाही तसा अद्याप अवकाश आहे. मात्र हातात येणाऱ्या पैशाची योग्य तजवीज व्हावी, ती सतत वाढती राहावी, यासाठी ‘अर्थब्रह्म’च्या रूपात गुंतवणुकीची गुरुकिल्ली वाचकांच्या हाती पडणार आहे. म्युच्युअल फंडापासून एसआयपीपर्यंत आणि पीपीएफपासून जमीन खरेदीपर्यंतच्या प्रत्येक गुंतवणूक पर्यायांबाबत या पुस्तिकेत विस्तृत माहिती देण्यात आली आहे. टपाल विभाग, बँक, विमा या पारंपरिक पर्यायांबरोबरच अन्य किचकट प्रक्रियाही विषद करून सांगितल्या आहेत. शिवाय अर्थक्षेत्राशी निगडित ‘संज्ञां’बाबतही या पुस्तकात तपशीलवार माहिती दिली जाणार आहे.
अर्थब्रह्म : २५ जुलैपासून सर्वत्र उपलब्ध