आला हिवाळा..
आपल्याकडे अद्याप वातावरणात प्रत्यक्षात गारवा आला नसला तरी कॉर्पोरेट क्षेत्रातील उत्पादन नावीन्यतेने हिवाळ्याची चाहूल मात्र दिली आहे. आयटीसी लिमिटेडची साबणाची नाममुद्रा ‘विवेल’ने हिवाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी ‘लव्ह अँड नरिश’ ही नवीन श्रेणी बुधवारी प्रस्तुत केली. विवेल या नाममुद्रेची सदिच्छा दूत या नात्याने अभिनेत्री करिना कपूरने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात हे साबण प्रस्तुत केले.

नाशिकमध्ये ‘शेल्टर’ गृहप्रदर्शन १८ ऑक्टोबरपासून
मुंबई : ‘क्रेडाई’ या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासकांच्या संघटनेमार्फत निवासी संकुलासाठी वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरात ‘शेल्टर’नामक गृह प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
शहरातील मध्यवर्ती डोंगरे वसतिगृहाच्या पटांगणात १८ ते २१ डिसेंबरदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. संघटनेचे जयेश ठक्कर व प्रदीप पटेल यांनी या प्रदर्शनात अनेक आघाडीचे विकासक सहभागी होत असल्याची माहिती दिली.
या सातव्या प्रदर्शनात ३०० हून अधिक दालने असतील. पंतप्रधानांच्या पहिल्या आठ स्मार्ट सिटी योजनेत नाशिक शहराचा समावेश असल्याने येथे स्थावर मालमत्ता क्षेत्र विकासासाठी पोषक वातावरण असल्याचे यानिमित्ताने आयोजकांनी म्हटले आहे.

अंबरनाथ जयहिंद बँकेस दोन पुरस्कार
ठाणे: राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित बँकिंग फ्रंटियर पुरस्कारांपैकी ‘बेस्ट डाटा सिक्युरिटी’ आणि ‘उत्कृष्ट कर्ज योजना’ हे दोन पुरस्कार यंदा अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेस जाहीर झाले आहेत.
या दोन्ही विभागांत बँकेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वत:चा डाटा सेंटर असलेली मध्यम क्रमवारीतील अंबरनाथ जयहिंद को-ऑप. ही राज्यातील पहिली बँक आहे. बँकेच्या सर्व शाखा परस्परांशी जोडण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे बँकेने गेल्या काही वर्षांत महिलांसाठी अंबरसखी, अंबर रजनी, स्वयंसिद्धा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी अंबर छाया या अभिवन कर्ज योजना राबविल्या. त्याची दखल घेत बँकेस उत्कृष्ट कर्ज योजना पुरस्कार देण्यात आला. अध्यक्ष विलास देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर सामंत, तज्ज्ञ संचालक श्रीराम पाटणकर आदींनी हे पुरस्कार स्वीकारले.

एफएलआयआर सिस्टीम्सकडून किफायती तापमापक उपकरण
मुंबई: सर्वोत्तम तंत्रज्ञानाचे पाठबळ असल्याने शक्तिशाली तरी किमतीच्या दृष्टीने अत्यंत किफायती असे ‘टीजी १६५’ नावाचे छोटेखानी आयआर थर्मोमीटर हे उपकरण एफएलआयआर सिस्टीम्स या अमेरिकी कंपनीने भारताच्या बाजारात प्रस्तुत केले आहे. विशेषत: ज्या ठिकाणी अकस्मात वाढलेले तापमान हे धोकादायक ठरू शकते, अशा कामांमध्ये अदृश्य तापमानवाढ अचूकतेने हेरून त्यासंबंधाने इशारा व आवश्यक दुरुस्तीही सुचविणारे हे उपकरण, घर-कार्यालयातील हीटिंग, वेन्टिलेशन तसेच वातानुकूलन यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे कंत्राटदार, विजेची कामे करणारे तांत्रिक, औद्योगिक व्यावसायिक व कामगारांना उपयुक्त ठरेल, असा या अमेरिकी कंपनीचा दावा आहे.