‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मंचावर तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांना कानमंत्र
मोठय़ा गटांगळीने सेन्सेक्सला येत असलेली घेरी, डॉलरच्या समोर कित्येक महिन्यांच्या तळ भोवऱ्यात सापडलेला रुपया, मौल्यवान धातू दरांनी पुन्हा घेतलेली महागाईकडील उसळी असे सर्व भयावह वातावरण असताना गुंतवणूकदारांनी मात्र धीर सोडू नये; उलट त्यातील सातत्य अशा स्थितीतही कायम राखावे, असा बहुमूल्य अर्थसल्ला तज्ज्ञांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावरून दिला.
‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत आणि ‘न्यू इंडिया इश्युरन्स कं. लि.’चे प्रायोजकत्व लाभलेल्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाचे दुसरे सत्र वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ सभागृहात पार पडले. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, नवीन निवृत्ती योजना (एनपीएस) अशा साऱ्या गुंतवणूक पर्यायाचा या वेळी अर्थागाने ऊहापोह करण्यात आला.
भविष्यातील तजवीजविषयीचे गांभीर्य नमूद करताना मिलिंद अंध्रूटकर यांनी सांगितले की, वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केलेली गुंतवणूक केव्हाही तुम्हाला निवृत्तीसमयीची निश्चितता प्रदान करते. या वयात जोखीम स्वीकारण्याची तुमची तयारी असल्याने कमी कालावधीत अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक पर्यायाकडेही वळायला हरकत नाही, असेही ते म्हणाले. भांडवली बाजार अधिक खोलात असताना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे, हे त्यांनी ताज्या घडामोडींचा दाखला देत सांगितले. भविष्य निर्वाह निधी, स्थिर उत्पन्न देणाऱ्या ठेवी तसेच एनपीएसबद्दलची परतावा, कर, बाहेर पडण्याचा मार्ग, वारस आदींबाबतचे सविस्तर विवेचन त्यांनी या वेळी केले.
भांडवली बाजाराचा ताजा आढावा सचित्र घेताना या विषयातील तज्ज्ञ आशीष ठाकूर यांनी समभाग खरेदी-विक्री करताना अवलंबिण्याचे मार्ग या वेळी सांगितले. समभागाचा अभ्यास तांत्रिक पद्धतीने कसा करता येईल, हेही त्यांनी निवडक उदाहरणावरून नमूद केले. स्वस्तातील समभाग सरसकट खरेदी करण्याचा मोह टाळणे ते कमीत कमी ४० टक्के परतावा मिळविल्याशिवाय बाहेर पडू नये, असे ते या वेळी म्हणाले. २०२० पर्यंत भारत हा महासत्ता होणार आहे; तेव्हा त्यापासून बाजाराची तेजी कशी हिरावून घेता येईल, हे नमूद करीत ठाकूर यांनी या कालावधीपर्यंत सेन्सेक्स ५०,००० पासून दूर राहू शकणार नाही, हे ठामपणे सांगितले. भांडवली बाजाराचा मार्ग हा संपत्ती संचयनाच्या मार्गावरून जात असल्याचेही ते म्हणाले.
भांडवली बाजारातील निवडक मात्र आघाडीच्या समभागांच्या मूल्य प्रवास अधोरेखित करताना वसंत कुलकर्णी यांनी मुदत ठेवी, विमा योजना आदी पर्यायातून उत्पन्न व महागाई यांची सांगड घालता येणार नाही, असे स्पष्ट केले. महागाई व दीर्घायुष्य हे एकमेकांचे शत्रू असल्याचे ते म्हणाले. मिळकतीचा दर हा महागाईच्या दरापेक्षा कमी असता कामा नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले. अशा स्थितीत योग्य जीवनशैली जोपासायची असेल तर अधिक परतावा देणारा मार्ग जोपासावयास हरकत नाही, असे ते म्हणाले. वित्तीय नियोजनासाठी वेळ आणि निधी देण्याची तयारी असावी, यावरही त्यांनी भर दिला. मोठी संपत्तीनिर्मिती ही केवळ भांडवली बाजारातूनच होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
सभागृहात खच्चून भरलेल्या श्रोत्यांमध्ये सुरुवातीला असलेले चिंतेचे वातावरण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर उत्सुकता व उत्साहात परिवर्तित झाले. कार्यक्रमादरम्यान प्रश्नोत्तरे तर त्यानंतर थेट संवाद साधत गुंतवणूकदारांनी या वेळी शंकांना मोकळी वाट करून दिली. तज्ज्ञांनीही त्याचे यथायोग्य निरसन करण्याचा प्रयत्न केला.

‘सेकंड होम’ उद्याची पहिली गुंतवणूक ठरेल’
गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित झालेल्या स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीवर या वेळी ‘दिशा डायरेक्ट’चे संतोष नाईक यांनी प्रकाश टाकला. आपल्या एक तपाच्या या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी कंपनीने निवडलेले प्रकल्पस्थळ भविष्यातील महत्त्वाची ठिकाणी होतील, असे नमूद केले. शहरांपुढील गावे आता विकसित होत असून एकूणच परिसरही पायाभूत सुविधा, महत्त्वाच्या सोयी-सुविधांनी सज्ज होत आहे, असे ते म्हणाले. अलिबाग, कर्जत, शहापूर, तळेगाव आदींची नावे त्यांनी वानगीदाखल दिली.