आठवडय़ाची मुलाखत : रिलायन्स म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का

म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत व फोलियोत (खात्यात) वाढ झाली असली तरी अद्याप वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ दिसत नसल्याने, रिलायन्स निप्पोन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीच्या (रिलायन्स म्युच्युअल फंड) पुढाकाराने प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला म्युच्युअल फंड दिवस साजरा करण्याच्या साजरा करण्याची घोषणा मुंबईत झाली. या उपक्रमाबद्दल रिलायन्स म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिक्का यांच्याशी केलेला हा वार्तालाप

  • प्रत्येक महिन्यातील ५ रोजी म्युच्युअल फंड डेसाजरा करण्यामागची नेमकी कारणे कोणती?

आज बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाची पातळी वरच्या टप्प्यावर आहे. म्युच्युअल फंडाची मालमत्ता १८ लाख कोटींच्या पातळीपर्यंत आहे. म्युच्युअल फंडांच्या खात्यात रोज भरपडत असतानादेखील भारतातील लोकसंख्येपैकी केवळ ४ टक्के लोकसंख्या ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहे. या मोजक्या गुंतवणूकदारां व्यतिरिक्त मोठी लोकसंख्या ही म्युच्युअल फंडाच्या परिघाबाहेर आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या परिघाबाहेरील असलेला घटकसुद्धा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा भाग असावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.

  • कमावत्या लोकसंख्येपैकी अगदीच लहान घटक म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा भाग असण्यामागची काय करणे आहेत?

भारतीयांना सोने जमीन जुमला स्थावर मालमत्ता यासारख्या भौतिक गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला आवडते. अभौतीक बाबींमध्ये गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास देशातील बँकांच्या व पोस्टातील मुदत ठेवीं व विमा उत्पादने या निश्चित परतावा देणाऱ्या साधनांची मोठी व्याप्ती आहे. या मागे अर्थसाक्षरतेचा अभाव एक प्रमुख कारण आहे. भारतीय गुंतवणुकदाराला स्थिर उत्पन्न गुंतवणूक अधिक प्रिय आहेत. महागाई आपल्या बचतीची Rयशक्ती कमी करते, गुंतवणुकीवर मिळणारा परताव्याचा दर महागाईपेक्षा अधिक असायला हवा, बचतीचा दर अधिक हवा असेल तर गुंतवणुकीत धोका पत्करण्याची तयारी असायला हवी. म्युच्युअल फंडात नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक तुमची मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्याचा सहजसोपा मार्ग आहे. हे वास्तव अजूनही लोकांना एक तर माहित नसावे अथवा त्यावर विश्वास नसावा. म्युच्युअल फंड गुंतवणुकीपासून दूर असलेल्या लोकांना म्युच्युअल फंडाच्या परिघात आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

  • एक दिवस असा सुद्धा असावा असे वाटण्यामागची कारणे काय आहेत?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या सांख्यिकीचा अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसते. वैयक्तिक गुंतवणूकदरापैकी ७५ टक्के गुंतवणूकदारांनी केवळ समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक केली आहे. त्यांच्यापैकी ९० टक्के लोकांनी केवळ एकाच फंडात गुंतवणूक केली आहे. ५० टक्के गुंतवणूकदरांनी त्यांच्या आयुष्यात एकदाच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे. सांख्यिकी हे वास्तव असल्याने त्यावर विश्वास ठेवायला हवा. महिन्याच्या ३० दिवसांपैकी २९ दिवस खर्चाचे व एक दिवस (प्रत्येक महिन्याची ७ तारीख) बचतीचा हे त्यामागचे कारण आहे.

दुसरी गोष्ट अशी की, निश्चलनीकरणानंतर बँकिंग क्षेत्राबाहेर अर्थात औपचारिक बचतीचा भाग नसलेले चलन औपचारिक व्यवस्थेचा भाग बनले आहे. साहजिकच या बचतीचा वाटय़ाचा लाभ म्युच्युअल फंड उद्योगाला व्हावा हा सुद्धा त्याचा मागचा उद्देश आहे.

तिसरी गोष्ट अशी की, व्याज दर जेव्हा कमी होतात तेव्हा गुंतवणूकदार अधिक परताव्यासाठी मुदत ठेवींकडून म्युच्युअल फंडाकडे वळताना दिसतात असा आमचा २००४ मधला अनुभव आहे. मुदत ठेवींवरील कमी होत असलेल्या व्याजदरामुळे गुंतवणूकदार पुन्हा म्युच्युअल फंडाकडे वळत असलेले दिसत आहे. हा एक अर्थसाक्षरता वाढविण्याचा आमचा प्रय आहे.