पंतप्रधान जन-धन योजनेसारख्या सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे बँकांकडून राबविल्या जात असल्या तरी दीर्घ मुदतीत या योजना राबविणे बँकांसाठी आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे या योजना दीर्घकाळ सुरू राहण्याचा उपाय म्हणून सरकारने मोबदल्याचा विचार करावा, असे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची बाजू मांडताना सांगितले.
जन-धन योजनेत उघडले जाणारे खाते हे तरी किमान आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य बनतील, यासाठी आम्ही सरकारपुढे प्रस्ताव ठेवला आहे. सरकार हा मुद्दा वाऱ्यावर सोडणार नाही, याची आपल्याला खात्री आहे, अशी पुस्तीही भट्टाचार्य यांनी पुढे बोलताना जोडली. त्यांच्या हस्ते स्टेट बँकेचे अंग असलेल्या एसबीआय सिक्युरिटीज लि.च्या मुंबईतील नवीन कॉर्पोरेट कार्यालयाचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन झाले.
लोअर परळस्थित मॅरेथॉन फ्युचरेक्स बहुमजली मनोऱ्याच्या १२ व्या मजल्यावर हे ३०,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक कार्यालय आहे.