एकूण ५५ शाखा व ३९ एटीएम केंद्रांद्वारे संपूर्ण राज्यात पाच लाखांपेक्षा जास्त खातेदार असलेल्या महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेने ‘रूपे’ भरणा प्रणालीवर आधारित ‘महा रूपे डेबिट कार्ड’ आपल्या ग्राहकांसाठी प्रस्तुत केले. बँकेने या आधीच रूपे एटीएम कार्ड आपल्या खातेदारांना दिले असून, त्या जागी हे नवे कार्ड विनामोबदला बदलून दिले जाईल, असे बँकेचे अध्यक्ष गुलाबराव शेळके यांनी सांगितले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)चे संचालक पुष्पेंद्र सिंग आणि या सुविधेसाठी बँकेला तंत्रज्ञानात्मक पाठबळ पुरविणाऱ्या पिनॅकस या कंपनीचे संस्थापक गोविंदन या प्रसंगी उपस्थित होते. रूपे डेबिट कार्ड प्रस्तुत करणारी महानगर बँक ही देशातील ४६वी नागरी सहकारी बँक असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. ‘रूपे’चे सेवा जाळे स्वीकारणाऱ्या सहकारी बँकांची संख्या १७२ वर गेली असून, अलीकडे दर आठवडय़ाला चार-पाच नवीन बँकांकडून संलग्नता मिळविली जात असल्याची त्यांनी माहिती दिली. महानगर बँकेचा राज्याबाहेर कार्यविस्तारण्याचा मानस असून ‘बहुराज्यीय दर्जा’साठी रिझव्‍‌र्ह बँकेला दिलेल्या अर्जावर पुढील दोन-तीन महिन्यांत निर्णय अपेक्षित आहे.