रतन टाटा यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना सूचना
महाराष्ट्रातील पायाभूत सेवा क्षेत्राबद्दल नाराजी व्यक्त करतानाच नवउद्यमांमध्ये वैयक्तिक गुंतवणुकीचा धडाका लावणाऱ्या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी नवउद्यमींच्या नावीन्यतेला बळ देण्यासाठी राज्यात नवीन संशोधन केंद्र स्थापन करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मांडली. नावीन्यतेने भारलेल्या तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे येथील औद्योगिक उद्यानांमध्ये सर्व सुविधा पुरविण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
‘मेक इन इंडिया’ सप्ताह प्रदर्शनादरम्यान सोमवारी आयोजित ‘महाराष्ट्रात गुंतवणूक’ मंचावरून देशातील आघाडीच्या उद्योजकांनी राज्यातील आवश्यक उपाययोजनांची जंत्रीच मांडली. यात भाग घेताना टाटा यांनी नावीन्यतेला बळ मिळण्यासाठी तरुण उद्योजकांकरिता अधिक संशोधन केंद्रे उपलब्ध करून देण्याची गरज मांडली. राज्यातील नवउद्यमींकरिता पूरक वातावरण निर्मिती करण्यालाही राज्याने भर द्यावा, असे ते म्हणाले.
टाटा म्हणाले की, भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) आणि त्याच्यासारख्या अन्य शिक्षण संस्था यांच्या व्यतिरिक्त देशात अन्य संस्थाही आहेत. जेथे तरुणांना नावीन्यतेकरिता मार्गदर्शन मिळते. त्यांच्यातील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा अधिक संशोधन केंद्रांची गरज आहे. कौशल्य, संपर्क, नावीन्यतेची उपलब्धता हे सारे जे नवउद्यमी क्षेत्राला आवश्यक आहे ते पुरविण्याची जबाबदारी प्रशासन-सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात नवउद्यमींना अधिक आकर्षित करण्यासाठी केवळ वित्तीय नव्हे तर चांगल्या कल्पना अधिक हातभार लावू शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्राची प्रगती होत असली तरी पायाभूत सेवा क्षेत्रात हे राज्य अपयशी ठरल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. मात्र याचवेळी त्यांनी राज्याचे सध्याचे धोरण सकारात्मक असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. राज्यासाठी कृषीक्षेत्रही तेवढेच महत्त्वाचे असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. टाटा सन्सचे अध्यक्षपद २०१२मध्ये सोडल्यानंतर रतन टाटा यांनी नवउद्यमांमधील गुंतवणुकीचा एकच धडाका लावला. नावीन्य आणि सेवा क्षेत्रातील १४ हून नवउद्यमांमध्ये त्यांनी वैयक्तिक गुंतवणूक केली आहे.
‘भारतीय निर्मितीला महाराष्ट्राचे बळ’ या विषयावरील या चर्चासत्रात टाटा यांच्याबरोबर भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी, सन फार्माचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी, रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, एरिक्सन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पाओलो कोलेल्ला आदीही सहभागी झाले.
चर्चासत्राची सुरुवात करताना सूत्रसंचालक महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा समूहाच्या वाहन विभागाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांनी चर्चेत सहभागी वक्ते हे १०,००० अब्ज डॉलरच्या उद्योग समूहाचे मालक असून त्यांची मुख्यालये महाराष्ट्रात असल्याचे आवर्जून सांगितले.
बाबा कल्याणी यांनी राज्यात कौशल्य क्षेत्र विकसित करण्यावर भर दिला. देशातील चौथ्या पिढीतील निर्मिती क्षेत्राची वाढ राखायची असेल तर संपूर्ण कौशल्य धोरणात बदल करावा लागेल, असे सुचविताना कल्याणी यांनी सरकारचे अस्तित्वच नको असे म्हणून चालणार नाही, तर उद्योगाकरिता कृती करण्याकरिता या यंत्रणेची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षण, कौशल्य, नावीन्य, संशोधन व विकास या क्षेत्रांवर संघवी यांनी भर दिला. औषधनिर्माण क्षेत्राकरिता मुंबईचे महत्त्व अनन्यसाधारण असून, या भागात संशोधन व विकास केंद्रे स्थापित होण्याची गरज त्यांनी मांडली. निर्मिती क्षेत्रात गुणवत्तेला अधिक महत्त्व असल्याचे नमूद करत सिंघानिया यांनी उद्योगांकरिता कायदेविषयक बाबी हे चर्चेचे मुद्दे असल्याचे म्हणाले.
व्यवसायपूरक वातावरणासाठी उद्योगांकरिता पोषक निर्णय घेतले जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना मेसवानी यांनी डिजिटल क्रांती येत्या दशकात लक्षणीय असेल, असे नमूद केले.