राज्यातील फलोत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर वाव मिळण्याच्या दिशेने पावले पडली असून फुलांच्या उत्पादक वाढीसाठी नेदरलँडबरोबर करार करण्यात आले आहेत. तर राज्यातील संत्र्यांची आखाती देशातील बहारिन व आशियातील सिंगापूरला निर्यात करण्यात येणार आहे. देशातील प्रमुख फुलांची उत्पादकता वाढीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञाकरिता तसेच फुलांची नवी जात विकसित व लागवडीकरिता नेदरलँडबरोबर करार करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. एकात्मिक फलोत्पादन विकास मोहिमेंतर्गत याबाबतच्या ठोस कृती आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यात येत असून फुले गुणवत्ता केंद्र उभारणीकरिता राज्यात पुण्यानजीकच्या तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेची निवड करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. तीन वर्षे कालावधीच्या या प्रकल्पासाठी ९४७.३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातील संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने राज्यातील १० शहरांमध्ये संत्रा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय अपेडा व राज्य कृषी पणन महामंडळ तसेच महाऑरेंज संस्थेच्या बैठकीत घेण्यात आला.