स्पर्धा आयोगाने ठोठावलेल्या दंड प्रकरणात आव्हान देण्याचा निर्णय महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र तसेच टाटा मोटर्स या कंपन्यांनी घेतला आहे. सोमवारी आयोगाने विविध १४ वाहन उत्पादक कंपन्यांवर २,५४५ कोटी रुपयांचा दंड ठोठावणारा आदेश दिला, त्यात महिंद्रला २९२.२५ कोटींचा, तर टाटा मोटर्सला १,३४६ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
योग्य त्या मंचासमोर या निर्णयाला आव्हान दिले जाईल, असे या कंपन्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या ज्ञापनांत कळविले आहे. कंपनी याबाबतची सर्व माहिती गोळा करत असून या व्यवहारातील सर्व बाबी स्पष्ट करणार असल्याचेही म्हटले आहे. महिंद्रच्या दंडाची रक्कम ही समूहाच्या २००७ ते २००९ या तीन वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढालीच्या २ टक्के प्रमाणात आहे.
ग्राहकाला सेवा प्रदान केल्यानंतर वाहनांच्या सुटय़ा भागाबाबतचे नियम धुडकाविले प्रकरणी स्पर्धा आयोगाने १४ वाहन उत्पादक कंपन्यांवर दंड ठोठावला आहे. स्पर्धा कायदा २००२ नुसार आयोगाने या कंपन्यांना दंड जारी केला आहे. याविरोधात कंपन्यांना स्पर्धा अपिल लवादापुढे ६० दिवसांच्या आत न्याय मागण्याची सोय आहे.