पाच वर्षांपूर्वी टाटा समूहाने ज्या माफक दरातील गृहनिर्मिती व्यवसायात आणि ज्या ठिकाणावरून प्रवेश केला त्याच क्षेत्रात आणि त्याच भौगोलिक क्षेत्रात तिची स्पर्धक महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रनेही शिरकाव केला आहे. मुंबईनजीकच्या बोईसर येथे २० लाख रुपयांच्या आतील घरांची निर्मिती करण्याचा संकल्प महिंद्र लाइफस्पेसेसने सोडला आहे.
महिंद्र लाइफस्पेसेस डेव्हलपर्सने ठाणे जिल्ह्य़ातील पश्चिम द्रुतगती मार्गावरील बोईसर येथे २० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची घरे पुढील दोन वर्षांत बांधणार आहे. प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळातील या सदनिका असतील. कंपनीच्या ‘हॅप्पीनेस्ट’ या प्रकल्पांतर्गत महिन्याला २० हजार ते ४० हजार रुपये वेतन असणाऱ्यांना येत्या दोन महिन्यांत सुरू होणाऱ्या या प्रकल्पात गुंतवणूक करता येईल.
वाहन क्षेत्रात महिंद्रची स्पर्धा टाटा समूहासमोर आव्हान निर्माण करणारी आहे, अशी कबुली टाटा सन्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी निवृत्तीपूर्वीच दिली होती. टाटा समूहाने नॅनो घरांची कल्पना मांडत पाच वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्य़ातील पश्चिम मार्गावरील बोईसर येथे माफक दरातील घरांच्या निर्मितीचा प्रारंभ केला होता. आता महिंद्रनेही याच स्पर्धेत उतरत, याच भागातून, हीच संकल्पना राबविण्याचे निश्चित केले आहे.
कंपनीच्या प्रकल्पाला सर्व आवश्यक परवानगी मिळाली असून खरेदीदारांना वित्त साहाय्यासाठी समूहातीलच महिंद्र फायनान्ससह मुथ्थूट फायनान्स यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. बोईसरसह चेन्नईतील दोन टप्प्यांतील हे निवासी प्रकल्प २,२०० फ्लॅटसह एकूण १० लाख चौरस फूट जागेत असतील. येत्या महिन्यात चेन्नई, तर ऑगस्टमध्ये बोईसरच्या प्रकल्पाचा शुभारंभ होईल, असेही सांगण्यात आले.

मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या बोईसर येथे टाटा हाऊसिंगद्वारे नॅनो गृहनिर्मिती प्रकल्प साकारण्यात आल्यानंतर या भागात अनेक छोटय़ा खासगी विकासकांनीही आपले तंबू ठोकले. पहिल्या प्रतिसादानंतर टाटानेही येथेच दुसराही प्रकल्प साकारला. दरम्यान या भागातील घरांचे दर २,५,०० चौरस फुटांवरून आता थेट ३,५०० चौरस फुटांपर्यंत गेले आहेत. विरार-डहाणू रेल्वे वाहतूक विस्तारानंतर येथे विकासकामांना अधिक गती आली आहे.