भारतीय वाहन बाजारपेठेतील एसयूव्ही श्रेणीत अव्वल स्थान असलेल्या महिंद्र समूहाने कॉम्पॅक्ट एसयूव्ही नव्याने प्रवेश करण्याचा निश्चय केला असून या गटातील तिचे पहिले वाहन येत्या सप्टेंबरमध्ये दाखल होणार आहे.
टीयूव्ही ३०० या नावाने तयार करण्यात आलेले हे वाहन ४ मीटरपेक्षाही कमी लांबीचे असून त्याची किंमत ६ ते १० लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. फोर्डच्या इकोस्पोर्ट तसेच रेनोच्या डस्टरला हे वाहन तोड देण्याची शक्यता आहे.
महिंद्र समूह सध्या तिच्या क्व्ॉन्टोमार्फत कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत आहे. मात्र या वाहनाला फार प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीने स्वत: विकसित केलेले नवे इंजिन व आरेखन या जोरावर टीयूव्ही ३००ची रचना केली असून या नाममुद्रेची ओळख गुरुवारी मुंबईत करून देण्यात आली.
समूहाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, प्रवासी वाहन विभागाचे अध्यक्ष प्रवीण शहा, विपणन विभागाचे विवेक नायर आदी या वेळी उपस्थित होते.
चालू आर्थिक वर्षांत पाच एसयूव्ही प्रकारातील वाहने सादर करण्याचे समूहाने निश्चित केले आहे. पैकी टीव्हीयू ३०० हे दुसरे वाहन असून सुधारित एक्सयूव्ही ५०० मेमध्येच बाजारात आले.
नवे वाहन कंपनीच्या पुण्यानजीकच्या चाकण प्रकल्पात तयार करण्यात येत आहे, तर सैन्यातील रणगाडय़ाच्या धर्तीवरील या गाडीचे आरेखन (डिझाइन) तिच्या चेन्नई येथील केंद्रात करण्यात आले आहे.