महाराष्ट्रात चार वाहन उत्पादन प्रकल्प असलेल्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र समूहाने त्याच्या तेलंगणामधील प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत तेथील प्रकल्पातील वाहन निर्मिती क्षमता ९२ हजारांवर नेण्यात आली असून त्यापोटी नवी २५० कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.
स्पोर्ट यूटिलिटी प्रकारच्या वाहन बाजारपेठेत वरचष्मा असलेल्या महिंद्र समूहाने राज्यात भाजपा-सेनेचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी चाकणमध्ये नवा प्रकल्प साकारण्यासाठी तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारबरोबर करार केला होता. महिंद्रने यापूर्वीच महाराष्ट्राबाहेर जाण्याची धमकी दिली होती.
महिंद्र समूहाने आता तिच्या दक्षिणेकडील प्रकल्पांचा विस्तार करण्याचे निश्चित करत महाराष्ट्रातील प्रकल्प विस्ताराबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.
कंपनी महाराष्ट्रातील मुंबई, चाकण, नाशिक, इगतपुरी, झहिराबाद व हरिद्वार येथील प्रकल्पातून बहुपयोगी, प्रवासी कार, हलकी व्यापारी व तीन चाकी वाहनांची निर्मिती करते.
महिंद्रच्या तेलंगणा राज्यातील झहिराबाद येथे वार्षिक ७५ हजार वाहन निर्मितीचा प्रकल्प आहे. आता नव्या प्रकल्पात करण्यात आलेल्या विस्तार कार्यक्रमांतर्गत कंपनी येथून छोटेखानी व्यापारी वाहन तयार करणार आहे. चालू आर्थिक वर्षांत ते रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. विस्तार प्रकल्पामध्ये २५० कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली असून वार्षिक वाहन क्षमता ९२ हजारांवर नेण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी प्रकल्पस्थळी झालेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव व समूहाचे कार्यकारी संचालक पवन गोयंका उपस्थित होते.