महिंद्र समूहाला युरोपची बाजारपेठ खुणावत असून, समूहातील दुचाकी निर्मितीचे अंग असलेल्या महिंद्र टू व्हीलर्स लि.ने फ्रान्सच्या पीएसए समूहातील प्युजो मोटरसायकल्समधील ५१ टक्के हिस्सा खरेदीचा प्रस्ताव सादर केला आहे. युरोपीय बाजारपेठेत प्युजो स्कूटर्स या नावानेही ही कंपनी परिचित आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या, परंतु भरपूर मूल्य असलेल्या कंपन्यांचे अधिग्रहण करून त्यांचा कायापालट करणे हे अलीकडच्या काळात महिंद्र समूहासाठी नित्याचे बनले आहे. कोरियन कंपनी सांगयाँग मोटरनंतर आता गत १० वर्षांपासून तोटय़ात असलेल्या पीएसए समूहाच्या दुचाकी व्यवसायाकडे महिंद्रने लक्ष वळविले आहे. प्युजो ही जगातील दुचाकी निर्मितीतील सर्वात जुनी नाममुद्रा असून, युरोपच्या बाजारपेठेत ती ११६ वर्षांपासून अस्तित्वात आहे. फ्रान्समध्ये कंपनीचे सुमारे ५०० कामगार असून, चीनमधील संयुक्त भागीदारीच्या प्रकल्पात आणखी ३०० कामगार कार्यरत आहेत.
महिंद्रकडून प्युजो मोटरसायकल्समध्ये हिस्सा खरेदी आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना अर्थसहाय्य म्हणून १५० लाख युरो गुंतविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तथापि कंपनीच्या कर्मचाऱ्यांची अनुमती आणि अन्य कायदेशीर सोपस्कार त्या आधी पूर्ण करावे लागणार आहेत.
या घटनाक्रमाविषयी बोलताना मिहद्र अँड महिंद्रचे कार्यकारी संचालक पवन गोएंका म्हणाले, ‘‘महिंद्र आणि प्युजो यांचे एकत्र येणे हे दोघांच्या दुचाकी व्यवसायासाठी लाभकारक ठरणार आहे. दोन्ही कंपन्यांना आंतरराष्ट्रीय अस्तित्व विस्तारता येणार आहे.  प्युजोचा भारताच्या विस्तारित दुचाकी बाजारपेठेत प्रवेश महिंद्रमुळे सुकर होईल, तर जागतिक स्तरावर परिचित नाममुद्रा महिंद्रला भारतात आणता येतील, तसेच युरोपच्या बाजारपेठेतही ठसा उमटविता येईल.’’
महिंद्र समूहाने प्रचंड स्पर्धा असलेल्या दुचाकींच्या प्रागंणात उशिराने उडी घेतली असली, तरी या बाजारपेठेत हा समूह उत्तरोत्तर स्थान मजबूत करीत आला आहे. कंपनीने याच आठवडय़ात गस्टो या नाममुद्रेने नवीन स्कूटर बाजारात आणली आहे.

दशकभरात ३५ ताबा व्यवहार
महिंद्रने गत दशकभरात विविध ३५ कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. २००८ सालात कंपनीने पुण्यात मुख्यालय असलेल्या कायनेटिक मोटरवर ताबा मिळवून दुचाकी क्षेत्रात शिरकाव केला. ताजा ताबा व्यवहार मार्गी लागल्यास समूहाचे या क्षेत्रातील हे दुसरे अधिग्रहण ठरेल.

समभागात मात्र घसरण
शेअर बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये मंगळवारी एक टक्क्य़ांहून अधिक घसरण झाली असताना, महिंद्र अँड महिंद्रच्या समभागाने मात्र २.२६ टक्क्य़ांच्या घसरणीसह १३५९.१५ रुपयांवर विश्राम घेतला. प्युजो मोटरसायकल्समधील बहुतांश हिस्सा मिळविणे ही महिंद्र समूहासाठी सकारात्मक घटना असली, तरी ही कंपनी सध्या तोटय़ात आहे आणि प्रचंड आर्थिक गुंतवणूक करून तिच्या कायापालटाबाबत यशापयशाच्या अनिश्चितता गुंतवणूकदारांच्या मनात असल्याचे ही घसरण दर्शविते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.