गिरगाव चौपाटीवर हेमामालिनीचे नृत्य, अमिताभ बच्चन यांचे जाहीर कविता वाचन

देशाच्या आर्थिक राजधानीत येत्या शनिवारपासून रंगणाऱ्या सर्वात मोठय़ा गुंतवणूक सोहळ्याला महाराष्ट्रीयन सांस्कृतिकतेचे कोंदण लागणार आहे. ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाकरिता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, संगीतकार-गायक शंकर महादेवन, अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांनी प्रसारधुरा अंगावर घेतली आहे; तर भाजप खासदार व अभिनेत्री हेमामालिनी या सप्ताहादरम्यान नृत्य सादर करणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे जाहीर कविता वाचन करणार आहेत.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्ताने दक्षिण मुंबईतील गेट वे, गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशझोतात खुल्या मंचावर हे कार्यक्रम होणार आहेत.

गिरगावच्या मैदानावर कार्यक्रम करू देण्यास न्यायालयाने यापूर्वीच परवानगी दिली आहे. ‘महाराष्ट्र नाइट’अंतर्गत सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येथील कार्यक्रम सर्वासाठी खुला असेल. एकाच वेळी २५ हजार जणांना सामावून घेणारी येथील व्यवस्था आहे.

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी तयार केलेल्या भव्य मंचावरून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ लेणी यांचे चित्रदर्शन यानिमित्ताने घडविले जाणार आहे.

याच दरम्यान गेट वे आणि वांद्रे येथील किल्ल्यातही रोषणाई केली जाणार आहे. गेट-वे वर एलिफंटा महोत्सवाचे आयोजन होणार आहे, तर वांद्रे किल्ल्यात संगीतपर कार्यक्रम होतील.

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील वस्त्रोद्योगाला चालना देण्याकरिता ‘महाराष्ट्र वस्त्र प्रदर्शन’ होणार आहे.

याअंतर्गत भाजपच्या शायना एनसी, डिझायनर विक्रम फडणीस, अनिता डोंगरे यांनी तयार केलेली पैठणी आदी वस्त्र कलाकृती यावेळी सादर केल्या जातील.