दोन वर्षांच्या उच्चांकावरून नोव्हेंबरमध्ये पीएमआय निर्देशांक ५२.३ वर माघारी

निश्चलनीकरण प्रक्रियेचा मोठा फटका देशातील औद्योगिक उत्पादन क्षेत्राला बसला असून गेल्या महिन्यातील याबाबतचा निर्देशांक ५२.३ पर्यंत खाली आला आहे. मात्र सलग ११ महिन्यांत निर्देशांकाला ५० वर राहण्यात यश आले आहे.

निक्केई मार्किट इंडियाद्वारे जाहीर केला जाणारा निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) हा ५० अंशांच्या पल्याड समाधानकारक मानला जातो. आधीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हा निर्देशांक ५४.४ अशा २२ महिन्यांतील सर्वोत्तम पातळीवर नोंदविला गेला होता.

८ नोव्हेंबरपासून जाहीर झालेल्या निश्चलनीकरणामुळे नोव्हेंबरमध्ये उर्वरित कालावधीत क्रयशक्ती, वस्तूंचे उत्पादन तसेच नवीन मागणी यावर विपरीत परिणाम झाल्याचा निष्कर्ष व्यक्त करत निक्केई मार्किटने काढला आहे.

देशाचे चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे ७.३ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन बुधवारीच जाहीर झाले होते. विकास दरातील किरकोळ सुधार व सातत्याने कमी होत असलेली महागाई यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या आठवडय़ात सादर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर कपात अपेक्षित केली जात आहे.

सरकारद्वारे आकस्मिकरीत्या अमलात आलेल्या निश्चलनीकरणामुळे निर्मिती क्षेत्रातील अडचणीही वाढल्याचे यानिमित्ताने निक्केई मार्किटचे अर्थतज्ज्ञ पोलिआना लिमा यांनी म्हटले आहे.

सात टक्क्य़ांखालील अर्थविकास दराचे आणखी एक भाकीत

आघाडीच्या पतमानांकन संस्थांपाठोपाठ अमेरिकास्थित बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचनेही भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षांकरिता सात टक्क्य़ांखाली अंदाजला आहे. सध्या सुरू असलेल्या निश्चलनीकरणातून भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन २०१६-१७ या संपूर्ण आर्थिक वर्षांत ६.९ टक्के असेल, असे तिचे भाकीत आहे. तर पुढील आर्थिक वर्षांकरिता हा दर ७.२ टक्के असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.