लिलावपूर्व काळात अदा केलेल्या सर्व कोळसा खाणवाटप रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सप्ताहारंभीच भांडवली बाजारात कमालीची अस्वस्थता निर्माण केली. हा निकाल येण्यापूर्वी दुपारच्या सत्रात ऐतिहासिक उच्चांकाला असलेले प्रमुख निर्देशांक दिवसअखेर खालच्या स्तराला स्थिरावले. या स्थितीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व्यवहारात २६,६३०.७४ पर्यंत झेप घेत शुक्रवारच्या तुलनेत किरकोळ अंश वाढीने बंद झाला. तर सत्रात ७,९६८.२५ पर्यंत झेपावलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर नाममात्र घसरणीने विसावला.

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्सने १७.४७ अंशांची वाढ नोंदवत दिवसअखेर २६,४३७.०२ हा सर्वोच्च टप्पा पार केला. निफ्टी मात्र विक्रमापासून माघार घेताना ६.९० अंश घसरणीसह ७,९०६.३० वर येऊन ठेपला. निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च स्तर २२ ऑगस्ट रोजीचा ७,९२९.०५ आहे. मात्र सेन्सेक्स १९ ऑगस्टचा सार्वकालिक उच्चांक सोमवारी मागे टाकण्यात यशस्वी ठरला.
१९९३ ते २०१० दरम्यान अदा केलेल्या सर्व कोळसा खाणींचे वाटप सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्दबातल ठरविले. याचा अपेक्षित परिणाम खनिकर्मशी संबंधित पोलाद समभागांवर बाजारातील व्यवहारात दिसून आला. प्रमुख निर्देशांक व्यवहारात सर्वोच्च टप्प्यावर असतानाच या क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य दुहेरी आकडय़ातील टक्क्यांमध्ये आपटले. दिवसअखेरही जिंदाल स्टील, हिंदाल्को, भूषण स्टील, टाटा स्टील, सेसा स्टरलाइट, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान झिंक, सेल, एनएमडीसी यांच्यातील घट १.८९ ते १३.९७ टक्क्यांपर्यंत राहिली.
तेजीसह नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा मुंबई शेअर बाजार शुक्रवारच्या तुलनेत सत्रातील मध्यापर्यंत २१० अंशांनी वधारला होता. या वेळी तो २६,६३०.७४ या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचला. दिवसअखेर तो आठवडय़ापूर्वीच्या विक्रमी अंकाला मागे टाकत नव्या उच्चांकावर स्वार झाला. निफ्टीला मात्र ही कामगिरी बजाविता आली नाही. तो दिवसअखेर नकारात्मक स्थितीत आला. सेन्सेक्सने यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारात शतकी वाढ नोंदविली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या दणक्याने पोलाद समभागांना मोठे नुकसान सोसावे लागले. तर बँक, बांधकाम, भांडवली वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांच्या घसरणीमुळेही सेन्सेक्सला मोठय़ा फरकाच्या अंशांची झेप घेण्यास अडथळा निर्माण झाला. विशेषत: येथे गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचे दर्शन झाले. हे क्षेत्रीय निर्देशांक २ टक्क्यांपर्यंतची घट नोंदविणारे ठरले.