कॉर्पोरेट क्षेत्राच्या चांगल्या तिमाही निकालांच्या परिणामी बाजाराची धारणा आजवर सकारात्मक राहिली आणि रिझव्‍‌र्ह बँकेने दर कपातीला अनुकूल पतधोरण स्वीकारल्याने या धारणेला आणखीच बळ मिळाले. पण एकंदरीत पाहिल्यास, बाजाराचा निर्देशांक केवळ तोंडदेखला तेजीचा आहे, प्रत्यक्षात समभागांचे भाव लक्षणीयरीत्या हलताना दिसत नाही. वास्तविक सेबीने कडकलक्ष्मीचा अवतार घेऊन अलीकडे केलेल्या कारवायांपायी सामान्य गुंतवणूकदार रु. ६० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक मुद्दलीचे भवितव्य धोक्यात आले आहे. ‘सेबी’कडून शेअर बाजार सूचिबद्ध कंपन्यांच्या व्यवहारपद्धतीनुसार असलेली गटवारी बदलली जाणे स्वाभाविकच आहे. पण त्याची वारंवारिता अलीकडे प्रचंड वाढली आहे. शिवाय सेवीने काही कंपन्यांतील उलाढालही स्थगित केली आहे. प्रवर्तकांनी सट्टेबाजांना हाताशी धरून काळेबेरे केल्याचा हा परिपाक असला तरी या कंपन्यांत गुंतवणूक केलेल्या जनसामान्यांचा पैसा मात्र नाहक अडकला आहे. भारतात तिसरा मोठा राष्ट्रीय शेअर बाजार ‘एमसीएक्स-एसएक्स’च्या रूपाने अवतारीत होत असताना शेअर गुंतवणूकविषयक हे असे निराशाजनक चित्र आहे. एकूणात जानेवारी २०१३ मध्ये निर्देशांकांनी दोन वर्षांपूर्वीच्या उच्चांकांना गवसणी घातली असली तरी जागतिक तुलनेत आपल्या बाजारांची कामगिरी सर्वाधिक वाईट राहिली आहे.
विदेशी वित्तसंस्था मात्र भारताच्या भांडवली बाजाराबाबत कमालीच्या आश्वस्त असल्याच्या दिसतात आणि हीच बाब शोचनीय आहे. एकीकडे शेअर बाजारातील तळचा गुंतवणूक वर्ग म्हणजे अल्पसंख्य जनसामान्यांची बेचैनी वाढेल अशी स्थिती आहे, तर मूठभरच असलेल्या पण प्रभावशाली विदेशी गुंतवणूकदार वर्गाचा रूबाब वाढत जावा, हे चांगले लक्षण म्हणता येणार नाही. अनेक कंपन्यांच्या भागभांडवलातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (एफआयआय) हिस्सा हा विहित मर्यादेच्या कळसाला पोहचला आहे. देशी वित्तसंस्था व म्युच्युअल फंड निरंतर विक्री करून या ‘एफआयआय’ना खरेदीसाठी आवश्यक ते खाद्य पुरवीत आहेत.  
रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनुकूल नितीच्या परिणामी व्याजदर घसरले तर त्याचा फायदा बांधकाम व वाहन उद्योगाला निश्चित होईल. असे कयास बांधून बाजारातील या दोन्ही निर्देशांकाची चढती कमान कायम आहे. डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, अनंतराज इंडस्ट्रीज वगैरे समभागांचे वधारलेले भाव याचा प्रत्यय देतात.
गुरुवारी सौदापूर्तीचा दिवस म्हणून तर शुक्रवारी नफारूपी विक्रीतून बाजाराने आपटी खाल्ली. एकूण बाजार धारणा वर दिलेल्या कारणांमुळे उत्तरोत्तर साशंक बनत चालली आहे. बाजाराच्या भावभावना किती झपाटय़ाने बदलतात पाहा. अर्थसंकल्पापूर्वी निर्देशांकांकडून नवीन उच्चांकाचे कळस गाठले जाण्याबाबत काही दिवसांपर्यंत जवळपास सर्वच आशावादी होते, आता पारडे बदलणारे उंदरांचा सुळसुळाट सुरू झालेला दिसून येईल. फेब्रुवारीच्या अखेरीस चांगल्या अर्थसंकल्पाबाबत अपेक्षांचे मोठे पुल बांधले जात असले तरी हा महिनाही मामुली हालचालीचाच राहिल्यास नवल ठरू नये. या आठवडय़ात नवीन खरेदीसाठी एशियन पेंट्स चांगला वाटत आहे.