कंपन्यांच्या भागविक्रीतून सामान्य गुंतवणूकदारांच्या पदरीही लाभाचे फळ पडू शकते, याचा प्रत्यय ‘केअर’च्या शेअर बाजारात २६ टक्क्य़ांच्या धमाकेदार परताव्यासह झालेल्या ‘लिस्टिंग’ने दिला. अलीकडच्या काळातील गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद लाभलेल्या ‘केअर’सह ‘पीसी ज्वेलर्स’च्या भागविक्रीचेही बाजारातील पाऊल १० टक्क्य़ांच्या समाधानकारक वाढीसह पडले. २०१२ वर्षांची सांगता आणि शेअर बाजारासाठी नव्या उच्चांकांचे वर्ष मानल्या जाणाऱ्या २०१३ सालाच्या स्वागतपर पायाभरणी यापेक्षा चांगली काय ती असेल? आगामी जानेवारीमध्ये निफ्टी निर्देशांक नवीन कळस दाखविणार, हा बऱ्याच तांत्रिक विश्लेषकांकडून व्यक्त होत असलेला कयास हा संपूर्ण २०१३ सालाबद्दलच्या उमद्या आशावादाला खतपाणी घालणाराच आहे.
पण शेअर बाजार हा व्यापार-उदीम व अर्थव्यवस्थेतील बऱ्या-वाईट घडामोडींपासून अलिप्त नसतोच. २०१२ सालातील भ्रष्टाचार-घोटाळ्यांची मालिका आणि वर्षांच्या पूर्वार्धातील सरकारचे आर्थिक आघाडीवरील पंगुत्व व अनागोंदीला आगामी वर्षांत विराम मिळाला तरच बाजाराचा उच्चांक निश्चितच दिसून येईल. वर्ष मावळतीला आले आहे आणि बऱ्याच कालावधीपासून टाळाटाळ सुरू असलेल्या डिझेल-केरोसीनच्या दरात वाढीचे सूतोवाच हा आगामी काळाच्या दृष्टीने शुभसंकेत ठरावा. याच धर्तीवर विजेचे दरही आणखी वाढू घातले आहेत. आगामी खरेदीबाबत बोलायचे झाल्यास, बँकिंग व वित्तीय सेवा, ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम व पायाभूत क्षेत्र, भांडवली वस्तू ही उद्योगक्षेत्रे समृद्धीकडे नेणारी ठरतील. ऊर्जा क्षेत्राबाबत संमिश्र स्वरूपाचा कल राहील. त्या उलट युरोप-अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे पुढली काही वर्षे काहीच खरे नसल्याने सॉफ्टवेअर क्षेत्र आणि त्या देशांवर निर्यातीसाठी मदार असलेल्या तत्सम उद्योगक्षेत्रापासून गुंतवणूकदारांनी लांब राहावे, असेच जाता जाता सुचविता येईल.    

सॉफ्टवेअर क्षेत्र आणि त्या देशांवर निर्यातीसाठी मदार असलेल्या तत्सम उद्योगक्षेत्रापासून गुंतवणूकदारांनी लांब राहावे.