केंद्र सरकारचे करसुधारणेच्या दिशेने पडलेले पाऊल पाहून हर्षोल्लिस झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी भांडवली बाजारात खरेदी केली. याचा परिणाम सेन्सेक्स एकाच सत्रात एकदम २७ हजारावर तर निफ्टी ८,१०० च्या वर गेला.
बहुप्रतिक्षित वस्तू व सेवा कर कायदे अमलबजावणी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी उशिरा मंजुरी दिली. नवे कर विधेयक संसदेत पारित होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार असून एप्रिल २०१६ पासून तो प्रत्यक्षात येईल.
आंतरराष्ट्रीय घडामोडींनीही बाजाराला साथ दिली. अमेरिकी फेडरलची व्याजदर स्थिरतेची दोन दिवसांची बैठक संपुष्टात आली आहे. तर अर्थविवंचनेतून सावरू पाहणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या मनोगताकडे बाजाराकडे लक्ष लागले होते.
बुधवारी उशिरा केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब झालेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाचे बाजारात स्वागत होणे अपेक्षितच होते. व्यवहाराच्या सुरुवातीपासून ते प्रत्यक्षातही आले. सकाळीच मुंबई निर्देशांक तब्बल ३४० अंशाची वाढ राखणारा ठरला. दिवसभरातील त्याची तेजी सत्रअखेरही कायम राहिली.
गेल्या पाच व्यवहारात बाजारात घसरण नोंदली गेली आहे. अंशांमध्ये ही तब्बल १,१२०.९७ आहे. मंगळवारी तर त्याने चालू वर्षांतील एकाच दिवसातील सर्वात मोठी आपटीही नोंदविली होती.
मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह बंद झाले. त्यांच्यात १.०९ ते थेट ५.२६ टक्क्य़ांपर्यंत वाढ नोंदली गेली. भांडवली वस्तू, ऊर्जा, ग्राहकपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, बँक, वाहन, पोदाल आदी निर्देशांक तेजीत आघाडीवर राहिले. तर सेन्सेक्समधील ३० पैकी २७ समभागांचे मूल्य उंचावले. त्यातही भेल हा सार्वजनिक क्षेत्रातील समभाग ४.९१ टक्क्य़ांसह आघाडीवर राहिला. पाठोपाठ हिंदाल्को, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक यांना भाव मिळाला.
सलग पाच सत्रातील घसरणीनंतर तेजीवर आरुढ झालेला सेन्सेक्स आता २७ हजारापुढे वाटचाल करू लागला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारी सव्वाशेहून अधिक अंशांची वाढ राखणारा ठरला. यामुळे निफ्टी ८,१०० वर पोहोचू शकला.