भांडवली बाजारातील घसरण सलग तिसऱ्या व्यवहारातही कायम राहिली. गुरुवारी ११८ अंशांने घसरणारा मुंबई निर्देशांक २६,६०० नजीक येऊन ठेपला आहे. सेन्सेक्सचा हा प्रवास आता गेल्या साडे सहा महिन्याच्या तळात येऊन विसावला आहे.
एकाच व्यवहारात तब्बल ३ टक्क्य़ांची आपटी अनुभवत बुधवारी भांडवली बाजाराने २०१५ मधील दुसरी मोठी आपटी नोंदविली होती. बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री तूर्त कायम आहे. भांडवली बाजारातील गुरुवारच्या नकारात्मक प्रवासावर भारतीय चलनातील आपटीचेही सावट उमटले व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत घसरणाऱ्या रुपयामुळे बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता अधिक गडद होत निर्देशांकाला २६,५०० च्या दरम्यानच प्रवास करता आला.
सेन्सेक्सची गुरुवारची पातळी ही २१ ऑक्टोबर २०१४ नंतरची सुमार पातळी ठरली. तर गुरुवारच्या व्यवहारात मुंबई निर्देशांक २६,४२३.९९ ते २६,८५०.३७ दरम्यान राहिला. गेल्या तीन व्यवहारातील मिळून प्रमुख निर्देशांकाची घसरण ८९१.४८ अंश राहिली आहे. पैकी ७०० अंश आपटी बुधवारी एकाच व्यवहारात नोंदली गेली. ४ मार्च २०१५ मधील ३०,०२४.७४ या सर्वोच्च टप्प्यापासून सेन्सेक्स आता तब्बल ३,४२५.६३ अंश लांब आहे. टक्केवारीत हे प्रमाण ११.४० आहे. निफ्टीने यापूर्वी याच दिवशी ९,११९.२० हा सर्वोच्च टप्पा अनुभवला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक त्यापासूनही आता थेट १,०६१.९० अंश म्हणजेच ११.६४ टक्के दूरवर आहे.