गेल्या तीन दशकांपासून भारतीय वाहन बाजारपेठेवर वरचष्मा असलेल्या मारुती सुझुकीने वाहन निर्मितीतील १.५ कोटींचा टप्पा पार केला आहे. सेदान श्रेणीतील स्विफ्ट डिझायरही १.५ लाखावी कार कंपनीने आपल्या मानेसर प्रकल्पातून बाहेर काढली आहे.
विविध १३ हून अधिक प्रकारच्या वाहनांसह कंपनी प्रवासी वाहन विक्रीत अव्वल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मारुती ८००, अल्टो, व्हॅगन आर, ओम्नी, स्विफ्ट, डिझायरसारख्या पसंतीच्या वाहनांच्या जोरावर कंपनीने हा अनोखा प्रवास अनुभवला आहे. डिसेंबर १९८३ मध्ये सर्वप्रथम मारुतीसह कंपनीने वाहन उत्पादनाला सुरुवात केली होती. या तीन दशकांमध्ये कंपनीच्या ८००च्या २९ लाख, अल्टो श्रेणीत ३१ कार, ओम्नी १७ लाख तर व्हॅगन आर १६ व स्विफ्ट १३ आणि स्विफ्ठ डिझायर १० लाख तयार झाल्या आहेत.
मारुती सुझुकीने वाहन निर्मितीचा १० लाखावा टप्पा दोन दशकांपूर्वी, १९९४ मध्ये गाठला होता. तर ५० लाख वाहन निर्मिती १० वर्षांपूर्वी, २००५ मध्ये झाली होती. २०११ मध्ये कंपनीने एक कोटी वाहन निर्मिती नोंदविली.
नजीकच्या भविष्यात २ कोटी वाहन निर्मितीचे लक्ष्य राखणाऱ्या मारुतीने २०२० पर्यंत वार्षिक २० लाख वाहन विक्री नोंदविण्याचे धोरण आखल्याचे मारुती सुझुकीच्या उत्पादन विभागाचे कार्यकारी संचालक राजीव गांधी यांनी ‘वृत्तसंस्थे’ला सांगितले.