देशाच्या घसरत्या सकल उत्पादन दराची छाया गेल्या तिमाहीवर उमटली असतानाच ऑगस्टमधील कंपन्यांची वाहन विक्रीही मंदावली आहे. मारुती, टोयोटा, मिहद्रसारख्या कंपन्यांनी एकेरी आकडय़ातील विक्री वाढ गेल्या महिन्यात नोंदविली आहे.
सणांच्या हंगामाच्या तोंडावर देशातील कंपन्यांची वाहन विक्री यंदा रोडावली आहे. कमी मान्सूनचे संकट कायम असतानाच यंदाच्या दसरा-दिवाळीबाबतही कंपन्यांना विक्री वाढीची फार आशा दिसत नाही.
देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीच्या एकूण विक्रीत ऑगस्टमध्ये ६.४ टक्के वाढ झाली असून गेल्या महिन्यातील एकूण विक्री १,१७,८६४ राहिली आहे. वर्षभरापूर्वीच्या १,१०,७७६ वाहनांच्या तुलनेत यंदा ती एकेरी आकडय़ातच वाढली आहे.
कंपनीची देशांतर्गत विक्री ८.६ टक्क्यांनी वाढत गेल्या महिन्यात १,०६,७८१ झाली आहे. तर निर्यात ११.१ टक्क्यांनी घसरून ११,०८३ झाली आहे. कंपनीने गेल्याच महिन्याच्या सुरुवातीला सादर केलेल्या एस क्रॉसने ४,५०० विक्री नोंदविली आहे.
ह्य़ुंदाई मोटर इंडिया कंपनीच्या वाहनांची विक्री १३.५० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिन्यातील वाहन विक्री संख्या ५४,६०८ राहिली आहे. कंपनीची निर्यात १.७९ टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री ४०,५०५ वाहनांची आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या वाहन विक्रीत यंदा १.२९ टक्क्यांचीच वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ३५,६३४ वाहने विकली असून देशांतर्गत बाजारपेठत घसरण झाली आहे. निर्यात मात्र ७३ टक्क्यांनी वाढली आहे.
कंपनीच्या कृषी क्षेत्रातील वाहनांमध्ये २२.०३ टक्के घसरण नोंदली गेली आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये ११,६९९ ट्रॅक्टर विकले आहेत. या वाहनाची निर्यातही २५.५३ टक्क्यांनी घसरली आहे. कमी मान्सूनचा फटका वाहन मागणीला बसला आहे.
होण्डा कार इंडिया कंपनीने ६.५८ टक्केविक्रीतील घसरण नोंदवीत ऑगस्टमधील वाहन विक्री १५,६५५ राखली आहे. तर टोयोटा किलरेस्कर मोटर कंपनीच्या विक्रीत गेल्या महिन्यात अवघ्या सव्वा टक्क्याची वाढ होऊन ऑगस्टमधील एकूण विक्री १२,५४७ राहिली आहे. कंपनीने वर्षभरापूर्वी १२,३८६ वाहने विकली होती. तर ऑगस्ट २०१५ मध्ये १,३८६ वाहने निर्यात केली आहेत.
वाणिज्यिक वाहनांचा प्रतिसाद गेल्या महिन्यात तुलनेत अधिक राहिला आहे. आयशर मोटर्स, अशोक लेलॅण्डसारख्या कंपन्यांनी विक्रीतील दुहेरी आकडय़ातील वाढ ऑगस्टमध्ये राखली आहे. यामध्ये आयशर मोटर्सची विक्री २० तर अशोक लेलॅण्डची विक्री ३९ टक्क्यांनी वाढली आहे.
दुचाकी वाहन क्षेत्रालाही यंदा फारसे यश आले नाही. सुझुकी, रॉयल एनफिल्ड वगळता इतर कंपन्यांना गेल्या महिन्यात अधिक प्रमाणात लाभ झाला नाही. होण्डा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर्सची विक्री गेल्या महिन्यात २ टक्क्यांनीच वाढली आहे. कंपनीच्या ३,९५,२६२ दुचाकींची विक्री या दरम्यान झाली. कंपनीची मोटरसायकल विक्री १७.४१ टक्क्यांनी घसरली आहे. तर स्कूटर विक्री मात्र १३.३१ टक्क्यांनी वाढली आहे. तुलनेत सुझुकी मोटरसायकलची विक्री थेट ६७.५८ टक्क्यांनी वाढून ३६,६३६ झाली आहे.