मिड-सेडान श्रेणीतील नवी कार मारुती सुझुकी बाजारात आणत असून तिची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया प्रथमच बुधवारपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीच्या वेळी वाहन खरेदीदाराला २१ हजार रुपये भरावे लागणार आहेत.
पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारावर धावणाऱ्या ‘सिआझ’ ही नवी कार भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध होत आहे. १.४ लिटर पेट्रोल इंजिन व १.३ लिटर डिझेल इंजिन असणाऱ्या ‘सिआझ’ची इंधनक्षमता अनुक्रमे २६.२१ व २०.७३ किलो मीटर प्रति लिटर असेल.
कंपनीची ही नवी कार ह्य़ुंदाईच्या वर्ना व होन्जाच्या सिटीबरोबर स्पर्धा करेल. त्यांच्या किमती सध्या ७.१९ ते ११.७२ लाख रुपये दरम्यान आहेत. याच श्रेणीतील नवी झेस्ट टाटा मोटर्सने गेल्याच महिन्यात रस्त्यांवर उतरविली आहे.
या सेदान श्रेणीत कंपनीची सध्या एसएक्स४ ही कार आहे. नवी ‘सिआझ’ आल्यानंतर ही कार बाद होईल, असे सांगण्यात येते. याचबरोबर कंपनीची याच श्रेणीतील स्विफ्ट डिझायर ही कारदेखील आहे. कंपनीने स्पोर्ट युटिलिटी व वाणिज्यिक वापराच्या छोटेखानी वाहनश्रेणीतही उतरण्याची तयारी केली आहे. कंपनीच्या ताफ्यात सध्या विविध १३ प्रकारचे प्रवासी वाहने असून वर्षभरात ही संख्या दुप्पट करण्याचा मनोदय कंपनीने यापूर्वीच व्यक्त केला आहे.