डिजिटल परिवर्तनाला मायक्रोसॉफ्टचे योगदान

मध्यम आणि लघु उद्योग तसेच सरकारी कामकाजांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत कंपन्यांच्या समस्यांपासून ते सामाजिक समस्यांपर्यंत सर्वावर तंत्रज्ञानाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे करत असतानाच सामान्य वापरकर्त्यांसाठी टूजीवर चालणारी व आधारशी जोडणारी ‘स्काइप लाइट’ ही स्काइप अ‍ॅपची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे.

आंध्रप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील विविध सरकारी विभाग तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, फ्लिपकार्ट, टाटा मोटर्स आता मायक्रोसॉफ्टचा क्लाऊड आणि मोबाइल तंत्रज्ञान वापरत आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, ग्राहकांना अधिकाधिक आकर्षून घेणे, प्रक्रिया अधिक उत्पादनक्षम बनवणे आणि उत्पादने तसेच सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे. मायक्रोसॉफ्टने मुंबईत आयोजित केलेल्या ‘फ्युचर डिकोडेड’ या कार्यक्रमात बुधवारी कंपनीचे मुख्याधिकारी सत्या नाडेला यांनी आपल्या भाषणात भारतात डिजिटल परिवर्तन कसे घडविले जाणार आहे याबाबत विचार मांडले. प्रत्येकाला तंत्रज्ञान सक्षम करण्याचे कंपनीचे उद्दीष्टय़ असून या दृष्टीने विविध कंपन्यांच्या सहकार्याने नवीन तंत्रज्ञान लोकांसाठी खुले करून दिले जात आहे. भारतीय नवउद्यमींमध्ये प्रचंड उत्साह आणि कल्पना आहेत. त्यांचा उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे नाडेला यांनी नमूद केले.

स्काइप लाइटची घोषणा

स्काइप लाइट हे कमी बँडविड्थवर काम करणारे जलद आणि इंटिग्रेटेड कम्युनिकेशन्स अ‍ॅप, खास भारतासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला मोबाइलमधील कॉल डायलर, लघुसंदेश, स्काइप डायलर या सर्व गोष्टी एकत्रितच पाहता येणार आहे. मोबाइल डेटा आणि वाय-फायच्यामाध्यमातून अ‍ॅपचा वापर किती झाला आहे याचा तपशीलही या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे. तसेच आपल्याशी संवाद साधण्यासाठी यामध्ये विविध बॉट्स देण्यात आले आहेत. या बॉट्सच्या माध्यमातून लोकांना विविध विषयांची माहिती मिळू शकणार आहे. तर बॉटसोबत गप्पाही मारता येणार आहे. हे नवीन अ‍ॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची आधारशी संलग्नता जून २०१७पर्यंत पूर्ण होणार आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून घेण्यासाठी आधार सेवेचा फायदा होणार असल्याचे नाडेला यांनी नमूद केले. हे अ‍ॅप गुजराती, बंगाली, िहदी, मराठी, तामीळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

प्रोजेक्ट संगमअ‍ॅप

लिंक्डइन या अ‍ॅपची लाइट आवृत्ती म्हणजे प्रोजेक्ट संगम होय. यामध्ये कुशल कामगारांना नोकरी मिळण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन शिक्षणही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. िलक्डइनच्या रोजगार शोधक व्यासपीठाच्या शक्तीचा वापर करत कौशल्य विकास कार्यक्रमांना थेटपणे संबंधिक रोजगारांशी जोडणं हे या उपक्रमाचं ध्येय आहे. प्रोजेक्ट संगम हे यूजरना त्यांच्या ‘आधार’ ओळखीचा वापर करत नोंदणी करता येणार आहे.