भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बंगळुरूस्थित माइंड ट्री या अन्य एका सॉफ्टवेअर सेवाप्रदात्या कंपनीने आपल्या भागधारकांना उत्तम आर्थिक कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर १:१ बक्षीस समभाग देऊ केला आहे. कंपनीने सरलेल्या २०१३-२०१४ आर्थिक वर्षांत ५० कोटी डॉलरचा (सुमारे ३,००० कोटी रुपये) अनोखा महसुली टप्पा ओलांडला आहे. कंपनीने संपूर्ण वर्षांत गेल्या वर्षांच्या तुलनेत २८ टक्के अधिक म्हणजे ३,०३१.६ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न कमावले आहे. तर मार्च २०१४ अखेर कंपनीचा वार्षिक निव्वळ नफा ३३ टक्क्यांनी उंचावून ४५०.८ कोटी रुपयांवर गेला आहे. तर जानेवारी ते मार्च २०१४ दरम्यान १३.२८ कोटी डॉलर महसूल कमावला आहे.
सर्वात वेगाने १० कोटी डॉलरचा टप्पा गाठणाऱ्या या भारतीय कंपनीने प्रत्यक्षात मार्च २०१४ अखेर १०० कोटी डॉलरच्या महसुलाचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु युरोपातील ग्राहकांचे केंद्रीकरण असलेल्या कंपनीला तेथील अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे हे शक्य झाले नाही. तरी प्रति समभाग १०० रुपये कमाईचे लक्ष्य मात्र तिने गाठले आहे.