पुरातन काळापासून सोने मोजण्याचे तोळा हे परिमाण दशमान पद्धतीच्या अवलंबातून मागे पडले, पण सोन्याशी असलेल्या भारतीयांच्या या ऐतिहासिक नात्याशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न म्हणून ‘तोळा’ या नावानेच नवीन सुवर्ण नाणे येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला बाजारात येत आहे. मौल्यवान धातूंच्या व्यापारातील सरकारी कंपनी एमएमटीसीने स्वित्र्झलडस्थित पॅम्प या कंपनीबरोबर भागीदारीत स्थापित केलेल्या एमएमटीसी पॅम्प ही कंपनी हे नवीन नाणे बाजारात आणत आहे.

प्राचीन सुवर्णमुद्रांप्रमाणे अष्टकोनी आकाराची ही ‘तोळा’ नाणी ९९९.९ शुद्ध सोन्याची आणि त्यांचे वजन प्रत्येकी ११.६६३९ ग्रॅम इतके असेल. चालू वर्षांत अशी तब्बल पाच लाख ‘तोळा’ नाणी बनवून विक्रीला आणण्याचा एमएमटीसी-पॅम्पचा बेत आहे. पुढे जाऊन अर्धा आणि पाव तोळा सोन्याची नाणीही बाजारात येतील, असे एमएमटीसी-पॅम्पचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खोसला यांनी सांगितले.

सुरुवातीला एमएमटीसी-पॅम्पच्या निवडक विक्री केंद्रांमध्ये, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन पोटॅश लि. त्याचप्रमाणे देशभरातील निवडक २८ शहरांमधील प्रतिष्ठित आभूषण विक्रेत्यांकडे ‘तोळा’ नाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील. बंगळुरू, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली आणि हैदराबाद येथे एमएमटीसी-पॅम्पची दालने आहेत. सोने गुंतवणुकीचाही हा पर्याय बनावा यासाठी या नाण्यांच्या त्या वेळी प्रचलित किमतीनुसार फेरखरेदीची हमीही एमएमटीसी-पॅम्पने दिली आहे.

एमएमटीसी-पॅम्पकडे प्रतिवर्ष २०० टन सोने तर ६०० टन चांदी गाळण्याची क्षमता आणि दरसाल २५ लाख सोने-चांदीची नाणी घडविण्याची क्षमता असून, कंपनीची स्वमालकीच्या विक्री दालनांच्या विस्ताराचीही योजना आहे.