जगातील एक उमदी मोबाइल फोनची बाजारपेठ असलेल्या भारतात इंटरनेटचे आधिराज्य असलेल्या व्यापाराच्या नवीन परिवेशाने पारंपरिक मोबाइल विक्रेत्यांवर गंडांतर ओढवले आहे. नव्या स्पर्धकांना नियमाच्या चौकटीत बांधून आवर घालण्याचे आर्जव ते आता सरकारकडे करीत आहेत.
मोबाइल फोनचे पारंपरिक ऑफलाइन विक्रेते आणि इंटरनेटवरील नवीन ऑनलाइन दालनांतून होणारी मोबाइलची विक्री यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली असून, छोटे दुकान थाटून विक्री करणाऱ्यांपुढे या व्यवसायात तग धरून राहण्याचे आव्हान उभे राहिले आहे, असे ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनचे सहसचिव विभूती यांनी सांगितले.
अलीकडे अनेक हँडसेट निर्माते केवळ ऑनलाइन दालनांतून विक्रीसाठी विशेष मॉडेल्स प्रस्तुत करीत आहेत. पारंपरिक विक्रेत्यांना, ऑनलाइन विक्रेत्यांकडून होणाऱ्या विक्रीची मात्रा पाहता त्यांच्याशी स्पर्धा करणे अवघड बनले आहे. शिवाय दोहोंकडून होणाऱ्या विक्रीतील किमतीतील प्रचंड मोठी तफावतही एकंदर बाजारपेठेत मोठे असंतुलन निर्माण करणारे आणि निखळ बाजारपेठीय स्पर्धेसाठीही मारक ठरत आहे. त्यामुळे समान पायावर व्यवसायाची संधी निर्माण व्हावी यासाठी नव्या ई-व्यापार स्पर्धकांना ठोस नियामक चौकटीखाली आणण्याची असोसिएशनची मागणी आहे. नव्या ई-व्यापार स्पर्धकांकडून थेट विदेशी गुंतवणुकीच्या नियमांचे उघड उल्लंघन अथवा गैरवापर सुरू असल्याचा असोसिएशनचा आरोप आहे. कोणत्याही नियामक यंत्रणेच्या अभावी, खोटय़ा व कमअस्सल उत्पादनांचा पूर, वॉरन्टी न देता उत्पादनांची विक्री, करांची होणारी चोरी असल्या गैरप्रकारांनाही ऊत आला असून, तोदेखील एकूण बाजारपेठेच्या दृष्टीने मारकच असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी असोसिएशनने त्यांचे व्यापारी सदस्य व ग्राहकांच्या दृष्टीनेही उपयुक्त आपले मोबाइल अ‍ॅपही शुक्रवारपासून सुरू केले. ग्राहकांना नव्याने दाखल होणाऱ्या हँडसेट मॉडेलसंबंधी सर्व इत्थंभूत तपशील आणि त्यांचे अद्ययावत होणारे दर या अ‍ॅपच्या साहाय्याने कळविण्यात येतील. शिवाय ग्राहकांच्या तक्रारी, त्यांच्या विक्रीपश्चात सेवांचा तपशील व अशा सेवा केंद्रांची माहिती कळू शकेल.